अभ्यंग : आरोग्याचा विमा

आधुनिक काळात विज्ञानाच्या प्रगतीमुळे आयुष्य सुखकर तसंच आयुर्मान वाढल्याचे दावे करत असताना, यासोबत नवनवीन आजारांची आव्हानं, राहणीमानामुळे तयार झालेल्या असाध्य व्याधी, विशिष्ट उपचाराची दिशा न सापडणं या चक्रव्युहात वैद्यकशास्त्र सापडले आहे. बऱ्याच मोठ्या आजारात उपचाराला प्रतिसाद न देणारी लक्षणं आयुवेर्द शास्त्रातील दिनचर्या, ऋतुचर्या, पंचकर्म व स्थायी स्वरुपात मुळासकट आजार कमी करण्याची ताकद केवळ आयुवेर्द शास्त्रातच असल्याची स्पष्ट जाणीव परदेशी व्यक्तींना झाल्यानं भारतीय चिकित्सा पद्धतीचा वापर इतर देशांत मोठ्या प्रमाणात वाढला आहे.

आजार झाल्यावर ”स्वास्थस्य स्वास्थ रक्षणम्”प्रमाणे उपचार करण्यापेक्षा तो न होण्यासाठीचा प्रतिबंधक उपचार म्हणजे ‘अभ्यंग’ अर्थात अलिकडे प्रचलित झालेल्या शब्दांत सांगायचं तर मसाज.

अभ्यंगमाचरेत् नित्यं जराश्रमवातहा।

दृष्टी प्रसाद पुष्टयायु: स्वप्न सुत्वक्त्वदाढ्टर््यकृत्।।

अभ्यंगाचे होणारे फायदे वर्णन करताना आयुवेर्द ग्रंथकार वाग्भट म्हणतात, अभ्यंग दररोज नित्यनेमाने करावा. शरीर, इंदिय, सत्व, आत्मा, मन यांच्या संयोगाला जीवन अशी संवेदना आयुवेर्दात आहे. कर्ण, नेत्र, नाक या पंचेंदियांपैकी सर्व शरीरव्यापी व वाताचे आश्रयस्थान असणारे स्पर्शनेंदिय म्हणजे त्वचा. शरीराच्या आतील अवयवांचे संरक्षण, संवेदना पाठवणं, आजार परतवून लावणं अशी कामं त्वचेद्वारे होतात. विधीपूर्वक सिद्ध तेलाचा योग्य अभ्यंगाने त्वचेतील बारीक छिदांतून संपूर्ण शरीराचे स्नेहन, स्निग्धत्व मिळाल्याने शरीरातील अवयवांची कुरकुर बंद होते. केवळ अंग चेपल्याने सुख मिळते, तर अभ्यंगाने चिरकाळ टिकणारे फायदे होतात.

नित्य अभ्यंग केल्यास :

– वातदोष कमी होतो, रक्तप्रवाह प्राकृत होतो, त्वचेचं सौंर्द्य वाढतं.

– शरीरपुष्ट व बळकट होतं, डोळ्याचं तेज वाढतं.

– बेचैनी व अस्थिरता दूर होऊन बरं वाटतं.

– अनावश्यक चरबी कमी झाल्यानं शरीर बांधेसुद (फिगर) राहतं. चपळता येते, शांत झोप लागते, शरीरयष्टी उत्तम राहण्यास मदत होते.

– त्वचा मऊ, स्निग्ध बनते. अकाली सुरकुत्या पडत नाही.

– जळल्याचा, हाडे मोडल्याच्या वेदना कमी होतात.

– म्हातारपण उशीरा येतं, त्वचेचं सौंर्द्य वाढतं.

– मैथुनशक्ती वाढते. पाळीच्या तक्रारी नाहीशा होतात.

– प्रतिकारशक्ती वाढल्यानं आयुर्मान वाढतं.

डोक्यावर दररोज अभ्यंक केल्याने शिरोरोग होत नाहीत व केस काळे राहतात. केस पिकणं, गळणं, डोकं दुखण्यासारख्या तक्रारी दूर होतात. नियमितपणे कर्णपुरण म्हणजे कानात तेल टाकल्याने श्रवणशक्ती उत्तम राहते. खांदा, मान आखडण्यासारखी लक्षणे कमी होतात. मांड्यांच्या भागावरचा मसाजही असाच उपयुक्त ठरतो.

ठराविक अवयव दुखत असल्यास स्थानिक अभ्यंगाने फायदा होता. मानपाठ कंबर दुखणे, सांधेदुखी, लचकल्यास यामुळे आराम पडतो. शरीरावरची अतिरिक्त चरबी (उदा. नितंब, पोट, छाती) कमी करण्यासाठी औषधीचुर्णानेसुद्धा चुर्णाभ्यंग करण्याची पद्धत आजकाल आलीय.

अभ्यंगविधी : अभ्यंगासाठी वापरण्याचं तेल व औषधी ही ऋतुनुसार गरम अथवा थंड, प्रकृतीनुसार निवडलेली, सुगंधी, स्त्रोतोगामी, सुक्ष्म गुणाचं सिद्ध केलेलं असावं. कच्चे तिळ किंवा मोहरी तेल न घेता आयुवेर्दीय पाठाप्रमाणे सिद्ध केल्यास उत्तम लाभ मिळतो.

अभ्यंगासाठीचं ठिकाण शांत, सरळ हवेचा झोत येणार नाही अशी, प्रकाश असणारी, स्वच्छ व पवित्र वातावरणाचे असावे. अभ्यंग करुन घेणारा व करणारा दोन्ही व्यक्तींचे मन एकाग्र बनण्यासाठी हलके संगीत, मंत्र ऐकण्यास हरकत नाही. झोपणे शक्य नसल्यास बसुन अभ्यंग करता येतो. पाठीवर झोपून राहिल्यास छाती, चेहरा, पोट, मांड्या या भागावर विशिष्ट दाब देऊन, तर छातीवर झोपल्यास मान, पाठ, कंबर, नितंब, पाय व तळव्यांवर मसाज करता येतो. प्रत्येक अवयवाचा आकार, ठेवण यानुसार यानुसार दाब, गती ठेवावी लागते. छाती व पाठीच्या स्नायुंवर आतुन बाहेरच्या बाजुने, तर कंबर व पोटावर वर्तुळाकार दिशेने, मांड्या पोटऱ्यांवर वरुन खाली या प्रकारे कमीअधीक दाब देऊन मसाज केला जातो.

अवयवांवर दाब देताना स्नायुचा उगम, आकार, नैसगिर्क ठेवण यासोबतच ‘मर्मा’चा विचार करावा अन्यथा हानी होऊ शकते. सांध्याच्या ठिकाणी गोलाकार, पायांच्या ठिकाणी हृदयाच्या दिशेने मसाज करावा. पाठीचे मणके, हायापायाची बोटं यावर वर्तुळाकार गती ठेवावी. मसाजपूवीर् टाळूवर थोडेसे तेल व कानात दोन थेंब तेल सोडल्यास उत्तम. पालथं झोपल्यावर नाभीत तैलपुरण करुन अभ्यंगास सुरुवात करण्याची प्रथा आहे. अभ्यंग करणारा व्यक्ती प्रशिक्षित असावा अथवा स्वत: तज्ञ व्यक्तीकडून शिकून घेऊन मगच मसाज करावा. सामान्यत: १५ ते ४० मिनिटांपर्यंत मसाज करावा. कफाचा त्रास, अजिर्ण असणारे, आळशी व्यक्ती आणि पंचकर्म शोधनानंतर अभ्यंग करू नये. इतर वेळेस नवजात बालकापासून ते वृद्धांपर्यंत प्रत्येकाने विधीवत अभ्यंग केल्यास ”जीवेत् शरद: शतम्” या शुभेच्छांसाठी यंदाच्या दिवाळीत वेगळा आरोग्य विमा करण्याची गरजच नाही!

Leave a Reply