कोंडा झालाय

 

अनिश्चित वातावरणामुळे हिवाळ्यात थंडी अंगाला झोंबत तर नाहीच, पण गुलाबी थंडीचा निखळ आनंदही आपल्याला मिळत नाही. ऋतूचक्राप्रमाणेच ऋतू बदलत असतातच. त्यामुळे हेमंत ऋतूमधे सूर्यसंताप कमी होतो. दिवस लहान आणि रात्र मोठी असते. आयुवेर्दात असं म्हटलं जातं, की हेमंत ऋतू हा आरोग्याच्या दृष्टीने योग्य ऋतू आहे. कारण शरीरातील वात, पित्त, कफ हे तिन्ही दोष संतुलित असतात. या ऋतूत भूकही वाढलेली असते. आपण जर डाएटच्या दृष्टीने कमी आहार घेतलात तर वाढलेला जठराअग्नी शरीरधातू खाऊ लागतो. परिणामी अशक्तपणा जाणवतो. याचा सर्वात जास्त परिणाम होतो तो आपल्या केसांवर. शरीरातील स्निग्धपणा कमी होतो तसंच बाहेरचं वातावरण कोरडं असल्यामुळे केसातला रूक्षपणा वाढतो. या ऋतूत केसांच्या बाबतीत सतावणारी आणखी एक समस्या म्हणजे कोंडा. कोरड्या वातावरणामुळे केसांच्या मुळाजवळची त्वचा कोरडी पडते. मृतपेशी त्वचेपासून विलग व्हायला लागतात यालाच केसातला कोंडा म्हणतात. केसातील कोंडा हा केसांचा मोठा शत्रू आहे. जस जसं कोंड्याचं प्रमाण वाढत जातं तसं केसांचं प्रमाण कमी होऊ लागतं.

१. केसातला कोंडा कमी करण्यासाठी दही + अंडं + लिंबू + बेसन यांचं मिश्रण हा एक उत्तम लेप सिद्ध झाला आहे. सुकी त्वचा ही अल्कालाइन आहे, त्यावर हा लेप आम्ललाइन क्रिया करतो आणि त्वचेला समतोल ठेवतो.

२. त्रिफळा पावडर दह्यात भिजवून त्याचा लेपही एक उत्तम औषध म्हणून वापरण्यास काहीच हरकत नाही.

आता थोडंसं केसांबद्दल शास्त्रीय माहिती करून घेतली, तर आपल्याला केस का गळतात आणि त्यावर हेच उपचार का करायचे याची उत्तरं शोधायला सोप्पं जाईल.

केस हा कॅरेटिनपासून बनवलेला आहे. अंतत्वचेच्या तळाशी असलेल्या विशिष्ट पेशींमधून केसांची वाढ होते. तसंच केसांच्या मुळाशी लहान लहान तैलग्रंथी असतात तशाच रक्तवाहिन्याही असतात. त्या व्यवस्थित कार्यशिल असतील तर केसांना काही अपाय होत नाही. अती कोरडेपणामुळे त्वचेतील स्निग्धता कमी झाली तर केसांची छिदं मोठी होतात आणि केस गळायला सुरुवात होते. हे जर टाळायचं असेल, तर योग्य आहाराबरोबर केसांचा व्यायाम म्हणजे मसाज आवश्यक असतो.

मसाजसाठी सर्वसाधारणपणे बाजारातली तेलं आणतो. ती वापरण्यात काही विशेष फायदा नसतो कारण ती तीनदातरी गाळून त्यातील सर्व फॅट्स वगळले जातात. जे पोषण केसांना मिळायला पाहिजे ते मिळत नाही आणि केसांमधे दौर्बल्य उत्पन्न होतं. केसांचं सौंदर्य वाढवायचं असेल तर इथे दिलेले उपाय करून पाहा.

१. आयुवेर्दात घरगुती साजूक तुपाला जास्त महत्त्व आहे. म्हणून जर एक चमचा तूप रोज आहारात असणं फार आवश्यक आहे.

२. थंड पाण्याने केस धुणं या ऋतूत सहन होत नाही, म्हणून कोमट पाण्यानेच केस धुवावेत.

३. केसांचं मालिश खूप उपकारक ठरतं.

४. केसांना खोबरेल तेल लावण्यापेक्षा खोबऱ्याचा रस लावणं आवश्यक असतं.

५. तीळतेल गरम करून केसांना मसाज करावा.

६. दिवसा झोप घेणं हे या ऋतूत अपायकारक असतं.

७. अती विटॅमिन्सची औषधंही केसांच्या दृष्टीने हानीकारक असतात.

८. रात्री झोपताना अर्धा चमचा त्रिफळा पावडर गरम पाण्याबरोबर घ्यावी.

Leave a Reply