सौंदर्यासाठी परफेक्ट डाएट

नितळ त्वचा आणि सुंदर केसांशिवाय सौंदर्याची व्याख्या पूर्ण होणार नाही . म्हणूनच सौंदर्याची काळजी घ्यायची , तर या दोन्ही बाबींकडे लक्ष द्यायलाच हवं . खरं तर , आपल्या त्वचा आणि केसांच्या आरोग्यावरूनच आपलं एकंदर आरोग्य लक्षात येतं .

आज अनेकांना केस गळण्याची समस्या सतावत असल्याचं दिसून येईल . या समस्येची कारणं अनेक असली , तरी केस गळण्याचं प्रमाण वाढल्याचं निश्चितच जाणवतं . या समस्येमागची काही प्रमुख कारणं :

पोषणमूल्यांचा अभाव आणि असंतुलित आहार

विटॅमिन बी ६ , तसंच जीवनसत्त्वांचा अभाव

फॉलिक अॅसिडची कमतरता

रोजच्या आयुष्यात जाणवणाऱ्या तणावामुळे केसांच्या वाढीसाठी आवश्यक असणारी पोषणमूल्यं केसांपर्यंत पोहोचत नाहीत .

टॉयफॉइड , इन्फ्ल्युएन्झा , सदीर् – खोकला , अॅनिमिया यासारख्या गंभीर आजारांमुळे केसांची मुळं कमकुवत होऊन केस गळू शकतात .

केस नियमितपणे न धुतल्याने डोक्याची त्वचा अस्वच्छ बनते , यामुळे केस गळतात .

आनुवंशिकता

शरीरातील लोहाच्या कमतरतेमुळे हिमोग्लोबिनची पातळी कमी होते . यामुळे रक्तातून केसांना मिळणाऱ्या ऑक्सिजनच्या प्रमाणावर परिणाम होऊन केस गळू लागतात .

थॉयरॉइडचं कमी प्रमाण

बाळंतपणानंतर पोषणमूल्यांच्या अभावामुळे बऱ्याच स्त्रियांना ही समस्या जाणवते .

एखाद्या औषधाचा परिणाम किंवा केमोथेरपीसारख्या उपचारांमुळे केस गळतात .

वजन झपाट्याने कमी झाल्यासही केस गळतात .

यापैकी अनेक कारणांचं मूळ म्हणजे असंतुलित आहार . शरीराला आणि त्वचा , केसांना पुरेशी पोषकदव्यं न मिळाल्याने या समस्या उद्भवतात . आपल्या आहाराकडे योग्य लक्ष दिल्यास या समस्या सोडवणं निश्चितच शक्य आहे .

यासाठी संतुलित आहाराच्या टिप्स :

अधिकाधिक भर शाकाहारावर द्या . कृत्रिम पदार्थ / रंग / फ्लेवर्स असणारे पदार्थ खाणं टाळायला हवं .

भरपूर फळं आणि भाज्या खा .

आपल्या रोजच्या आहारात पुरेशी जीवनसत्त्वं , पोषणमूल्यं असतील , याची खात्री करून घ्या .

केसांची वाढ नीट व्हावी , यासाठी प्रोटीन आणि विटॅमिन ‘ ई ‘ चा आपल्या आहारात समावेश करा . यासाठी शेंगदाणे , मोड आलेली कडधान्य , योगर्ट , अंड , टोफू आणि मासे खाता येतील .

विटॅमिन ‘ बी ‘ आणि आयर्नमुळे केसांची वाढ चांगली होते . ब्राऊन राइस , बालीर् , दही , पालेभाज्या , हिरव्या शेंगा , डाळी आदींचा आहारात समावेश करा .

भाज्यांचा रस अॅण्टिऑक्सिडण्ट म्हणून फायदेशीर ठरू शकतात .

विटॅमिन सीचा आहारात अधिक समावेश करा .

भरपूर पाणी प्या .

त्वचेसाठी कोरफड जेल फायदेशीर ठरतो .

चमकदार आणि मजबूत केसांबरोबरच त्वचाही चमकदार असणं तुमचं सौंदर्य खुलवतं . चमकदार आणि सतेज त्वचेसाठी चांगला आहार घ्यायला हवा .

त्वचेवर पडणारे डाग रोखण्यासाठी , तसंच त्वचेतील तैलग्रंथींमधून तेलाची निर्मिती होण्यासाठी शरीराला झिंकची आवश्यकता असते . यासाठी झिंक असणाऱ्या पदार्थांचा आहारात समावेश करा . शेलफिश , सूर्यफूलाच्या बिया , डाळी , शेंगदाणे खाता येतील .

नॅचरल अॅण्टिबायोटिक आणि अॅण्टिसेप्टिक म्हणून चहाच्या झाडाचं तेल किंवा लिंबाचा वापर करता येईल . कापसाच्या बोळाने हे तेल जखम झालेल्या भागावर दिवसातून तीनदा लावा .

बीटा कॅरोटिनसाठी पालेभाज्या , गाजर आणि संत्र घ्या . यामुळे त्वचेतील नवीन पेशींची निमिर्ती चांगल्या प्रकारे होते .

आपल्या आहारात आळशी किंवा आळशीच्या बियांपासून बनवलेल्या तेलाचा समावेश करा . आळशीमुळे त्वचा नरम होते .

आहारात आवश्यक त्या पदार्थांचा समावेश करतानाच काही पदार्थ टाळायला हवेत . तेलकट , क्रीमी , प्रक्रिया केलेले , गोड पदार्थ खाऊ नका . असा समतोल आहार घेतल्यास त्वचा आणि केस चमकदार , सॉफ्ट बनण्यास मदत होते .

Leave a Reply