Secret of long hair

रहस्य लांब केसांचं

 

भारतीय स्त्री ही निसर्गत:च सुंदर असल्याचं जगभरातल्या लोकांचं मत आहे. तिच्या या सौंदर्यात मोलाची भर टाकतात ते तिचे लांब, चमकदार आणि निरोगी केस! केस हे आरोग्याचं प्रतिबिंब आहे. शरीरात झालेल्या बिघाडाचा परिणाम सर्वप्रथम केसांवर दिसतो. म्हणूनच सौंदर्यात भर टाकण्याबरोबरच केस आपल्या आरोग्याचेही निदर्शक मानले जातात. केस लांब असो वा मध्यम, ते निरोगी आणि दाट असले तरच चचेर्चा विषय बनतात.

पुराणकथांमध्येही स्त्रीच्या लांब आणि निरोगी केसांचा उल्लेख वारंवार आलेला आहे. ‘रामायणा’त सीतेच्या तर ‘महाभारता’त दौपदीच्या केशसंभाराची रसाळ वर्णनं अनेकदा वाचायला मिळतात. लांब आणि निरोगी केसांचा वारसा आजच्या आधुनिक विचारांच्या भारतीय स्त्रीनेही मोठ्या आपुलकीने जपला आहे.

हिंदी चित्रपटसृष्टीतला एक प्रॉमिसिंग मराठी चेहरा म्हणजे मंजरी फडणीस. मंजरीच्या निरागस चेहऱ्याने ‘जाने तू या जाने…’मधून प्रेक्षकांवर जादू केली. मंजरीचे केस लांब असून त्यावर निरोगी चमक आहे. ती सांगते, ‘लांब केस स्त्रीच्या सौंदर्यातला मूलभूत घटक असून जगभरात स्त्रीच्या सौंदर्याचं वर्णन तिच्या लांब केसांशिवाय पूर्ण होत नाही. मग ती रॅपुंझेल असो वा परी असो किंवा लहानपणी ऐकलेल्या गोष्टींमधली राणी… लांब आणि सुंदर केसांमुळे त्यांच्या सौंदर्याची विशेष चर्चा होत असे. आजच्या युवतींमध्येही लांब केसांबद्दल खूप आकर्षण आहे.

आमच्या घरात लांब केसांची परंपरा आहे. माझेही केस लांब आहेत. पण कुरळे असल्यामुळे त्यांची खरी लांबी कळत नाही. माझ्या केसांचं श्रेय माझ्या आईला जातं. लहानपणी तिने माझ्या केसांची नीट काळजी घेतली म्हणूनच ते आज दाट आणि निरोगी आहेत. निरोगी केसांसाठी सर्वात महत्त्वाचा असतो चौरस आहार. रोजच्या आहारात हिरव्या पालेभाज्या, फळं यांचा समावेश असावा. दिवसातून किमान आठ ते दहा ग्लास पाणी प्यावं. शक्यतो जंक फूड टाळावं.

लहानपणी ज्या पद्धतीने आईने माझ्या केसांची काळजी घेतली तशीच मी आजही घेते. म्हणूनच बिझी रूटीन असूनही माझे केस चांगले दिसतात. आठवड्यातून एकदा कोमट तेलाने केसांच्या मुळाशी मसाज करते. शॅम्पूने केस धुतल्यावर त्यांना कण्डिशनर लावते. केस धुतल्यानंतर लगेच बाहेर जायचं असल्यास ड्रायरने केस वाळवते आणि मगच बाहेर जाते. कारण ओल्या केसांना धूळ चिकटून ते खराब होतात.

स्प्लिट एण्ड्समुळे केसांची वाढ थांबते. तेव्हा दोन महिन्यातून एकदा केस ट्रिम करावेत. ट्रिमिंगमुळे केसांची वाढ चांगली होते आणि तेलाच्या मसाजने केस दाट होतात. सोबत समतोल आहार घेतला तर केसांचं सौंदर्य आणखी वाढेल.’

मंजरी निरोगी आणि चमकदार केसांसाठी चौरस आहाराला महत्त्व देते तर अभिनेत्री सोनाली खरे – आनंदच्या मते, केसांचे भरपूर लाड पुरवले पाहिजेत. ती सांगते, ‘शाळा-कॉलेजमध्ये असताना माझे केस लांब होते. चित्रपटात काम करू लागल्यावरही ते लांब ठेवण्यावर माझा भर होता. पण ‘तेरे लिए’ या हिंदी चित्रपटाची ऑफर आली आणि त्या कॅरेक्टरच्या मागणीनुसार मला केसांची स्टाइल बदलावी लागली. नंतर तो नवा लूक मलाच खूप आवडला. मला वाटतं केवळ आमच्याच क्षेत्रात नव्हे तर प्रत्येकाने आपल्या लांब केसांचं स्टायलिंग करून लूक बदलत राहावा. फ्रेश लूक आत्मविश्वास निर्माण करतो.

स्ट्रेटनिंग, पमिर्ंग, कलरिंग असे केसांवर निरनिराळे प्रयोग मला करावे लागतात. त्यामुळे केस मुलायम आणि तजेलदार राहण्यासाठी त्यांची सतत काळजी घ्यावी लागते. लहानपणापासून आईच्या मार्गदर्शनाखाली केसांची काळजी घेण्याचं मी शिकले आहे.

आठवड्यातून एकदा केसांना हलक्या हाताने तेलाचा मसाज करते. मसाज झाल्यावर गरम टॉवेल केसांभोवती गुंडाळून ठेवते. धुण्याआधी त्यांना दही किंवा अंडं लावते. दही आणि अंड्यामुळे केसांना नॅचरल कण्डिशनिंग मिळतं. थंडीच्या दिवसांत त्वचा कोरडी पडून नये म्हणून आहारात साजूक तूपाचा समावेश असावा. केसांची काळजी केवळ बाहेरूनच नाही तर आहारातूनही घ्यावी लागते. केसांचं सौंदर्य खुलवण्यासाठी त्यांचे लाड पुरवणं आवश्यक आहे.

Leave a Reply