Spa for hair – केसांसाठी ‘स्पा’

केसांसाठी ‘स्पा’

 

पावसाळा सुरू झाल्यापासून केस जरा जास्त गळू लागले आहेत असं वाटतंय ? हेअर स्पा घेऊन ही केसगळती थांबवता येईल .

प्रत्येकाच्या सौंदर्याची व्याख्या वेगवेगळी असली , तरी केस ही एक सर्वांत महत्वाची बाब आहे . हल्लीच्या धकाधकीच्या व प्रदुषणयुक्त जीवनामुळे ९९ % लोकांना केस गळण्याचा त्रास असतो . उन्हाळा , पावसाळा व हिवाळा या तीन ऋतूंपैकी पावसाळ्यात केस गळण्याचं प्रमाण जास्त असतं . त्यामागचं कारण म्हणजे वापरायच्या पाण्यात असलेले क्लोरिनचं जास्त प्रमाण .

अशा वेळेस केसांची चांगली काळजी घेण्यासाठी ‘ हेअर स्पा ‘ हा एक चांगला पर्याय आहे . ज्याप्रमाणे आपण शरीराला रिलॅक्स आणि मनाला प्रसन्न वाटण्यासाठी बॉडी स्पा घेतो त्याचप्रमाणे केसांच्या वाढीसाठी हेअर स्पा घेतला जातो . त्यामध्ये केसांना छान मसाज केला जातो तसंच हेअर पॅकमुळे त्यांचं सौंदर्य टिकवण्यास मदत होते .

हेअर स्पा देताना नेमकं काय केलं जातं ते आपण पाहू .

१ ) शॅम्पूने केस स्वच्छ धुतले जातात .
२ ) टॉवेलने केस कोरडे केले जातात , मात्र थोडासा ओलसरपणा ठेवला जातो .
३ ) केसांच्या लांबीला हेअर टॉनिक लावतात व नंतर हेअर पॅक लावून १० ते १५ मिनिटं मसाज देतात .
अशाप्रकारे हेअर स्पा घेण्याचे अनेक फायदे आहेत .
– शॅम्पूमुळे उघडे झालेल्या केसांच्या क्युटिकल्समध्ये टॉनिक पुरवल्यामुळे मजबूतपणा वाढून केस मऊ होतात .
– केसांची टोकं दुभंगण्याचे प्रमाण कमी होऊन दाटपणा वाढतो .
– १० ते १५ मिनिटं मसाज दिल्यानं केसांना योग्य रक्तपुरवठा मिळण्यास मदत होते व आरामदायक वाटतं .
– केसांना चमक येते .
विशिष्ट तांत्रिक पद्धतीनं दिलेला हेअर स्पा घेण्यासाठी पार्लर किंवा सौंदर्य तज्ज्ञांची मदत घेणं गरजेचं असतं . मात्र , ज्यांना हे शक्य नाही , त्यांना खाली दिलेले उपाय करता येतील .
– केसांचे सौंदर्य वाढवण्यासाठी आहार नियमित व योग्य असावा तसंच व्यवस्थित झोपही घेणं आवश्यक आहे .
– केस धुण्याच्या आदल्यादिवशी रात्री कोमट तेलानं मूळांना मसाज द्यावा . मसाजसाठी वापरलेलं तेल खूप दाट किंवा चिकट नसावं .
– आपल्या केसांना सूट होईल , असा शॅम्पू पाण्यात कालवून लावावा .
– शॅम्पू लावल्यावर मूळांना सोडून फक्त केसांच्या लांबीला कंडिशनर लावावं आणि दोन ते तीन मिनिटं ठेवून स्वच्छ धुवून घ्या .
– केस टॉवेलनं कोरडे करून झाल्यावर सिरम लावून विंचरून घ्या .
– आहारात विटॅमिन ‘ सी ‘ युक्त पदार्थ घ्यावेत .
– रोज सकाळी तोंड धुऊन झाल्यावर चिमूटभर ज्येष्ठमध पावडर घ्यावी . किमान सहा ते आठ महिने ज्येष्ठमध पावडर अनशापोटी घेतल्यानं केसांची चांगली वाढ होते . विरळपणा जाऊन केस दाट होण्यास मदत होते .
– ज्यांचे केस विरळ आहेत , अशांनी सौम्य शॅम्पू वापरावा . खूप गरम पाण्याने केस धुवू नये . हेअर ड्रायरने केस वाळवणं टाळावं .
– ज्यांना नियमितपणे हेलमेट वापरावं लागतं , अशांनी प्रथम डोक्याला कॉटनचा स्कार्फ बांधवा . हेलमेट काढल्यावर घाम पुसून डोकं कोरडं करावं . नाहीतर कोंड्याचं प्रमाण वाढून केस जास्त गळण्यास सुरुवात होते .

अशाप्रकारे छोट्या छोट्या गोष्टी नियमित पाळून आपण पावसाळ्यासारख्या दमट ऋतूतही केसांचं सौंदर्य वाढवता येईल .

Leave a Reply