गळणा-या केसांचे काय करायचे?

सकाळची वेळ होती आणि नेहमीप्रमाणे मी चहा पीत वर्तमानपत्र  चाळत होते. कामवाल्या मावशी केर काढत होत्या आणि अचानक माझ्या शेजारी येऊन उभ्या राहिल्या. “काय झालं गं?” मी विचारलं. “ एक सांगू ताई, वाईट तर नाही वाटणार न तुम्हाला?” तिने विचारलं. मला काही कळेना. “बोल की”, मी म्हणाले. “ताई, तुमचे केस खूप गळतायेत वाटतं, म्हणजे केर काढताना हा एवढा गुच्छा साफ करते मी! “ तिने हात वारे करत मला सांगायचा प्रयत्न केला. “माझ्याकडे एक मस्तं तेल आहे बघा… लावा तुम्ही… ७ दिवसात केसांचं गळण थांबेल !”

मी म्हणाले, “अगं बयो, केस सगळ्यांचेच गळतात!” तिच्या चेह-यावर प्रश्नचिन्ह उभा राहिलं. त्यावर मी तिला समजावण्याचा प्रयत्न केला आणि म्हणाले “ प्रत्येकाचे केस थोड्याफार प्रमाणात गळत असतात, काही व्यक्तींचे १० गळतात किंवा काहींचे १०० पर्यंत पण गळू शकतात. ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे..” तिला माझ्यावर विश्वासच बसेना. “घ्या! १००? मग तर टक्कल पडायची वेळ येईल कि हो! काहीही बोलता तुम्ही!” असं म्हणत ती कामाला लागली.

केसांबद्दल अनेक समज-गैरसमज आहेत आणि या एका प्रसंगावरून वरून वाटलं की या आठवड्यातील ब्लॉग केसांवर लिहावा.

केस हा शृंगाराचा भाग समजला जातो व केसांमुळे सौंदर्यात भर पडते हे खरं आहेच. आता केसांचा तसा फार उपयोग राहिलेला नाही. जसं प्राण्यामध्ये केस हे त्यांचं संरक्षण करतात तसंच जेव्हा माणूस जन्माला आला तेव्हा हे केस माणसाठीही संरक्षण करण्याचेच काम करत. शरीराच्या तापमानाच्या नियमनाचं काम पण ते करत. पण जशी जशी माणसाची उत्क्रांती होत गेली, अंगावर वस्त्र चढले, तसे तसे शरीरावरचे केस कमी होत गेले आणि आजमितीला केसांचा संबंध सौंदर्य पुरताच उरला.

आज अशी वेळ आली आहे की शरीरावरचे हेच केस आपल्याला अनावश्यक वाटू लागले आहेत व आपण विविध उपचार पद्धती वापरून त्यांना काढण्याचा प्रयत्न करतो; विशेषतः स्त्रिया हे अधिक प्रमाणात करतात.

विविध प्रकारचे व विविध प्रमाणात केस आपल्या संपूर्ण शरीरावर दिसतात. केस निर्माण होतात बीजकोशांमधून. प्रत्येक व्यक्ती ठराविक बीजकोषांची संख्या घेऊनच जन्माला येते. म्हणूनच प्रत्येक व्यक्तीमध्ये केसांचा दाटपणा, पोत (कुरळे किंवा सरळ) आणि रंग वेगळा असतो. या बिजकोशांची संख्या जनुकं गर्भाशयातच ठरवतात आणि जन्मानंतर या संख्येत वाढ होत नाही. उलटपक्षी केसांच्या आजारामुळे ही संख्या कमी मात्र होऊ शकते.

जशी आपली त्वचा सतत तयार होत असते तसेच आपले केस पण एका जीवन चक्रातून प्रवास करत असतात. जुने केस गळून नवीन केसांची उत्पत्ती होत असते. या जीवन चक्रानुसार शरीरावरचा प्रत्येक केस विकासाच्या ३ टप्प्यांमधून जातो.

टप्पा I / Anagen : केस वाढीचा टप्पा
टप्पा II / Catagen : केस गळून पडण्याच्या आधीचा टप्पा
टप्पा III / Telogen : केस गळण्याचा टप्पा

पहिल्या टप्प्यात/ आनाजेन टप्प्यात :
केसाची वाढ होत असते, व सर्वसाधारण अर्धा इंच (o.५ “) प्रती महिना या वेगाने होत असते. एक केस, जनुकं ठरवेल त्या प्रमाणे २ ते ६ वर्ष या टप्प्यात राहतो.

दुस-या टप्प्यात/ कॅटाजेन टप्प्यात:
शरीरातून संकेत चिन्ह मिळाल्यावर केसाची वाढ बंद होते. त्याला पोषक तत्व पुरवणं बंद करण्यात येतं. त्या केसा भोवतालचा रक्त पुरवठा सुद्धा बंद करण्यात येतो. म्हणजेच तो केस मृत होतो. केस, या टप्प्यात सर्वसाधारण प्रमाणे २ आठवडे असतो.

तिस-या टप्प्यात/ टीलोजेन टप्प्यात:
नवीन निर्माण होत असणारा केस त्या मृत केसाला बीजकोशांतून ढकलतो व बाहेर फेकतो. म्हणजेच केस गळून पडतो. जो पर्यंत तो नवीन केस पूर्णपणे निर्माण होऊन त्या मृत केसाला बाहेर ढकलत नाही तोपर्यंत हा टप्पा असतो. केस या टप्प्यात साधारण १ ते ४ महिने असतो.

सगळे केस एकाच टप्प्यात नसून ते ३ पैकी एका टप्प्यात आढळतात. जास्ती करून ९०% केस पहिल्या टप्प्यात असतात, १ ते २ % दुस-या टप्प्यात असतात आणि 10% ते १५% तिस-या टप्प्यात असतात. जर यातल्या कोणत्याही टप्प्याला इजा पोहोचली तर तो केस अकालिक त्या जीवन चक्राच्या बाहेर फेकला जातो व नेहमीपेक्षा केस गळण्याचं प्रमाण “वाढतं”! उदाः पहिल्या टप्प्यातल्या (आनाजेन) केसांना इजा पोहोचली तर ते सरळ तिस-या टप्प्यात (टीलोजेन) फेकले जातात आणि केस गळण्याचं प्रमाण अचानक खूप वाढतं. अशा वेळेस केसांच्या या आजाराला आपण टीलोजेन एफ्फ्लूवियम असं म्हणतो. तसंचं जर आनाजेन मधले केस गळायला लागले तर आपण त्या आजाराला आनाजेन एफ्फ्लूवियम असं म्हणतो व संप्रेरकांमुळे केस गळायला लागले तर आपण त्याला मेल पाटर्न हेअर लॉस (एम.पी.एच.एल.) असं म्हणतो.

माझ्या कडे अनेक पेशंट्स केस गळण्याच्या तक्रारी घेऊन येतात. अर्थात त्यात स्त्रियांचे प्रमाण जास्त आहे. पण आता पुरुषही सुजाण होत चालले आहेत आणि ते सुद्धा केस गळण्याची तक्रार घेऊन येतात.

स्त्रियांमध्ये पहिल्या क्रमांकावर टीलोजेन एफ्फ्लुवियम हा केसांचा आजार आहे. शारीरिक दृष्ट्या स्त्रिया जरा नाजूक आहेतच. त्यात आता त्या स्वावलंबी होत चालल्या आहेत, म्हणून घरचं काम करून ऑफिस मधली कामं त्या करत असतात. त्यामुळे स्वतःच्या आरोग्या कडे दुर्लक्ष होतं. घरातील ताण तणावाला आता ऑफिस मधील ताण ताणावाची भर पडली आहे. शारीरिक दग दग होते ती निराळीच. या सर्व कारणांमुळे केस पहिल्या टप्प्यातून तिस-या टप्प्यात फेकले जाऊ शकतात.  

दुस-या क्रमांकार आहे फिमेल पाटर्न हेर लॉस (एफ.पी.एच.एल.) ज्यात संप्रेरकांच्या (dihydrotestosterone) प्रभावाखाली बिजकोश येतो व केस गळायला लागतात. हा आजार अनुवंशिक आहे आणि प्रामुख्याने जनुकांच्या प्रभावामुळे कार्यान्वित होतो.
पुरुषांमध्ये तर टक्कल पडण्याची अवस्था नवीन नाही. इथेही संप्रेरक व जनुकांच्या प्रभावाखाली येऊन केस गळायला सुरुवात होते.

केस परत येतील की नाही अशी भीती पेशंट्सच्या मनात कायमच असते. ही भीती असणं साहजिक आहे. टीलोजेन एफ्फ्लुवियम, आनाजेन एफ्फ्लुवियम, कोंडा मुळे, पोषणात्मक कमतरते (रक्तक्षय) मुळे केस गळत असतील तर मग उपचाराने केस परत येतात. पण मेल ब फिमेल पाटर्न हेर लॉस मध्ये जर वेळेवर त्वचारोगतज्ञा कडून उपचार नाही घेतला तर मात्र केसाच्या त्या बीजकोशाला कायम स्वरूपी इजा पोहचून त्या बीजकोशातून परत केसाची उत्पत्ती होऊ शकत नाही. या सर्व आजारांवर मी पुढे सखोल माहिती देईनच.

चाळीशीतील अनेक पेशंट्सना अजून एक पडणारा प्रश्न हा की माझे केस आधी खूप दाट होते, काळेभोर होते, मग आता का नाहीत? त्यांची मागणी असते की परत तसेच केस त्यांना हवे असतात. इथे मी त्यांना एकच प्रश्न विचारते, की आपण काळाचं चक्र फिरवून आपलं वय कमी करू शकतो का? आपण वयाच्या २० व्या वर्षी जसे दिसत होतो तसे दिसू शकतो का? शेवटी aging ही प्रक्रिया आपण थांबवू शकत नाही. जसं आपलं शरीर वृद्ध होत जातं तशीच आपली त्वचा व त्यातील सर्व ग्रंथी व बीजकोश पण वृद्ध होत जातात. परत त्यावर वयोमानापरत्वे संप्रेरकांचा प्रभाव पडत जातो. थोड्याफार प्रमाणात आपण या प्रक्रियेला मंदावू शकतो पण थांबवू शकत नाही. केसांच्या बाबतीत हे तितकंच खरं आहे.

आपण एका दर्ज्यापर्यंत त्यांच्यात सुधारणा करू शकतो पण केसांना पूर्ववत करू शकत नाही. पांढ-या केसांचा उपचार सुद्धा तितकाच कठीण आहे कारण एकदा त्या बीजकोशातील मेलानिन (रंग) निर्माण करणारी पेशी मरण पावली तर तिला जिवंत नाही करता येत.
 
माझ्या मते चिंतेची बाब ही आहे की केसांमधील बदल चे चाळीसाव्या वर्षापासून दिसायला पाहिजेत ते आता विशीतच दिसू लागले आहेत. त्याचे कारण तुम्हा सगळ्यांना माहिती आहेतच. अनियमित आहार, मानसिक व शारीरिक ताण, प्रदूषण, अनेक प्रकारचे केसांवर केले जाणा-या प्रक्रिया, उदाः ironing, coloring, straightening, smoothening इ… हे आपण टाळू शकतोच. नियमित आहार घेणे हे आपल्या हातात आहे. ताण आपण संपूर्ण नाहीसा करू शकत नाही पण प्रयत्नपूर्वक ताण कमी नक्की करू शकतो.

केसांवर प्रक्रिया करून घेण्याबाबतीत पण मी हेच म्हणीन की एखाद-दुस-या वेळेला  प्रक्रिया केलीत तर अनेकदा चालूनही जातं, पण जर नेहमीच या प्रक्रिया तुम्ही केसांवर करत बसलात तर साध्या भाषेत बोलायचं झाल्यास, केसांची ‘वाट’ लागते. याउपर केसांच्या आजारासाठी त्वचारोगतज्ञाला भेटणं योग्य ठरतं कारण मग केस का गळतायेत याचं निदान ते करू शकतात व त्या प्रमाणे योग्य तो उपचार सुचवू शकतात. उपचार सुरु केल्यानंतर सुद्धा परिणाम दिसून यायला साधारण ३ ते ५ महिने लागतात. त्याचं कारण? मी आधी सूचित केलेल्या केसांच्या जीवन चक्रामुळे. केसाला, पहिल्या टप्प्या (केस वाढीच्या टप्पा) मध्ये जायला एवढा कालावधी जातोच!

आजकाल मार्केट मध्ये नानाविविध प्रकारच्या उपचारांच्या जाहिराती मी बघते. हे तेल लावा आणि घनदाट केस मिळवा. हे द्रव्य प्या आणि काळेभोर केस मिळवा. किंवा पार टक्कल असलेल्या स्त्रीला किंवा पुरुषाला केस आले आहेत अशी छायाचित्र दिसतात. माझ्याकडे येणारे बहुतांश पेशंट्सनी पण उपाय करून बघितलेले असतात व अपेक्षेनुरूप ते फोल गेलेले असतात. आपण इतर शरीराचे आजार झाले तर डॉक्टरांकडे जातोच मग त्वचा किंवा केसांबाबतीत आपण वेळ वाया का घालवतो? आपल्याला जाग उशिरा का येते? मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की नुसत्या तेलाने व द्रव्याने जर केस काळे भोर व दाट झाले असते एर सर्वांचेच नसते का केस गुढघ्यापर्यंत लांब व रात्राच्या रंगासारखे काळे?!

दुस-या दिवशी सकाळी मावशींनी मला तेल आणून दिलंच! माझ्या हातात तेल देत त्या म्हणाल्या, “ताई, तुम्ही काहीही बोललात तेरी पण हे तेल वापरून तर बघा! टक्कल पडे पर्यंत वाट का पहायची न?”  मी ती तेलकट बाटली हातात घेतली आणि हसत तिला थांक यू म्हणाले!

Leave a Reply