कुठला हेअरकट करू?

चांगला हेअरकट तुमचा लुक बदलूही शकतो आणि वाईट हेअरकटमुळे चांगला लुक बिघडूही शकतो. त्यामुळेच नीट विचार करुन तो निवडणं गरजेचं आहे.
कित्येक मुली पार्लरमध्ये गेल्यानंतर माझ्या चेह-याला शोभेल असा हेअरकट करा असं सांगतात. मग पार्लरवाली शहाणी असली तर ठीक नाहीतर , सगळा गोंधळ होऊन जातो. चेहऱ्याचा आकार , केसांचा प्रकार , उंची या गोष्टी लक्षात न घेता केलेला हेअरकट त्रासदायक होऊन जातो. तो करताना एक महत्त्वाची गोष्ट स्त्रियांनी लक्षात घ्यायला हवी. ती म्हणजे , आपलं व्यक्तिमत्त्व , आपला व्यवसाय किंवा आपण ज्या वातावरणात वावरतो त्याचा विचार करून हेअरकट करावा. उदा. शिक्षिकेला एखाद्या मॉडेलमप्रमाणे खूप पसरणारे केस चांगले दिसणार नाहीत , तर रिसेप्शनीस्टला साध्या पद्धतीनं कसीबशी बांधलेली पोनीटेल शोभणार नाही. नेहमी योग्य विचार करून हेअरकट केल्यास तुमचं व्यक्तिमत्त्व आणखी खुलून दिसेल.

अंडाकृती चेहरा- या चेहऱ्याला कसेही केस असले , तरी कुठलाही हेअरकट चांगला दिसतो. अगदी बॉयकटपासून लांब वेणीपर्यंत. अशा चेहऱ्याच्या मुलींना उंच , धिप्पाड व रूंद खांदे असतील तर खांद्यापर्यंत केस छान दिसतात. कमी उंचीच्या किंवा नाजूक स्त्रियांनी बॉयकटइतके लहान केस ठेवावेत.

हार्टशेप चेहरा- अशा चेहऱ्याच्या मुलींचे केस सरळ असतील , तर आखूड ठेवले तरी चालतात. बॉयकट जरी केला तरी कानापासून केसांची पट्टी थोडी बाहेर दिसेल अशा पद्धीतनं कापलेले असावेत. केस कुरळे असतील , तर मानेपर्यंत गोलाकार कापून स्टेपकट करावा.

लांब चेहरा- अशा चेहऱ्याच्या मुलींनी ‘ फ्लिक्स ‘ कापावेत म्हणजे कपाळ लहान दिसतं. आपलं वय आणि आवडीप्रमाणे किती प्रमाणात कपाळावरचे केस कापायचे ते आपण ठरवावं. तसंच कानापासून खांद्यापर्यंत रूळणारे व स्टेपमध्ये कापून बरेचसे बाहेर दिसतील अशाप्रकारे मागचे केस कापायला हवेत. खूप सरळ केसांना कपाळापासून सुरू होऊन खांद्यापर्यंत येणारा यू कट करावा आणि तो आतल्या बाजूला वळवावा.

गोल चेहरा – ब्लंट कट गोल चेहऱ्याला अगदी उत्तम दिसतो. ब्लंटचे कुठलेही प्रकार केले तरी ते चांगलेच दिसतात.
पंचकोनी चेहरा- गोल चेहऱ्याप्रमाणेच याही चेहऱ्याला कानाच्या बाजूने चेहऱ्यावर येणारे व मानेवरून पुढे येणारे केस शोभून दिसतात.

मोठा चेहरा- बऱ्याचवेळा मोठा चेहरा असलेल्या स्त्रियांची शरीरयष्टी धिप्पाड असते. त्यामुळे त्यांना केस कापताना चेहऱ्याच्या दुप्पट दिसतील अशी केशरचना असावी. म्हणजे चेहऱ्याच्या मोठेपणाकडे लक्ष जाण्याऐवजी केसांकडे लक्ष वेधलं जातं.
अतिशय छोटा चेहरा- अशा चेहऱ्याला केस पूर्ण मागे बांधलेले किंवा केस मागे नेणारा हेअरकट असावा. केस अजिबात चेहऱ्यावर येता कामा नयेत.

Leave a Reply