किडनी खराब झाल्यास करायचे काय?
मूत्रपिंड निकामी झाल्याचे कळल्यावर पेशंटला मोठा धक्का बसतो. मात्र, आता या व्याधीवर अनेक प्रकारचे उपाय उपलब्ध आहेत. ते करता येतात. तसेच, मूत्रपिंड प्रत्यारोपणही शक्य असते…
मूत्रपिंडे निकामी झाल्यानंतर पुढे काय करावे, असा खूप मोठा प्रश्न पेशंटपुढे असतो. प्रगत तंत्रज्ञानामुळे आता डायलिसिस आणि मूत्रपिंड प्रत्यारोपण असे दोन महत्त्वाचे वैद्यकीय उपाय आहेत. या व्याधीच्या अंतिम टप्प्यावरील उपायांना इएसकेडी पर्याय म्हणतात.निकामी मूत्रपिंडांना काम करायला लावणारी यंत्रणा म्हणजे रिनल रिप्लेसमेंट थेरपी आहे. या उपाययोजना मुख्यत्वे दोन प्रकारे करता येतात. त्यातील पहिल्या प्रकाराला पेरिटोनियल डायलिसिस हिमोडायलिसिस असे दोन प्रकार आहे
डायलिसिसचे काम कसे असते?
डायलिसिस मूत्रपिंडाचे काम करते. रक्तातील अनावश्यक घटक क्रिएटिन, युरिया, युरेमिक विषारी पदार्थ बाहेर टाकणे. रक्तातील शरीरातील अतिरिक्त पाणी बाहेर काढणे. पोटॅशियम, फॉस्फरस बाहेर काढणे. सोडियमचे प्रमाण राखणे. शरीरातील अॅसिडोसिसचे प्रमाण नियंत्रित करणे.
पोटामध्ये केले जाणारे डायलिसिस (पेरिटोनियम)
यात शरीरातच रक्त गाळण्याची प्रक्रिया सुरू होते, पोटाच्या पोकळीत आतल्या बाजूस आतड्यांवर एक आवरण असते. त्याला पेरीटोनियम असे म्हणतात. या पेरिटोनिल कॅविटी पोटामध्ये अनेक छिद्रे असलेली नळी बेंबीखाली छोटीशी चीर पाडून टाकली जाते. ही नळी सिलिकॅानसारख्या विशेष पदार्थांनी बनवलेली असते. ती मऊ आणि लवचिक असून पोट किंवा आतील भागांचे नुकसान न करता पोटातच राहते. या काळात रक्तातील घटक क्रिएटीनीन युरिया पेरिटोनियल द्रवात गाळले जातात. त्यासाठी प्लॅस्टिकच्या मऊ पिशवीत ठेवलेले दोन लिटर द्रव पोटात घातल्यावर रिकामी पिशवी कमरेला बांधून चालता फिरता येते. ही प्रक्रिया चोवीस तास सुरू असते. दिवसांतून असे तीन ते चार वेळा द्रव बदलले जाते. या काळात पेशंट हिंडू फिरू शकतो. तसेच, छोटी कामे वा नोकरीही करू शकतो. जीवनाचा आनंद घेऊ शकतो. ही पद्धती लहान मुलांमध्ये अनेकदा वापरली जाते. मात्र, हे डायलिसिस करताना जंतुविरहित ठिकाणी ते करावे लागते. कारण यात जंतुसंसर्ग होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे ते करताना ही खबरदारी निश्चितच घ्यावी लागते. या नळीद्वारे दिवसातून तीन ते चार वेळा दोन लिटर डायलिसिस द्रव पोटात ढकलला जातो आणि सहा ते आठ तासांनंतर हा द्रव बाहेर काढला जातो. मधल्या काळात पेशंट आपले सर्व काम नेहमीसारखे करू शकतो. पी. डी. द्रव जेवढा वेळ बाहेर असते त्याला ड्वेल टाइम असे संबोधतात.