Marriage and hairstyle

घरच्या लग्नाचा एपिसोड | लग्नसराई आणि प्रसाधन इंडस्ट्री


एकमेकांची पसंती झाल्यावर लगबग सुरू होते ती खऱ्या अर्थाने एका इव्हेंटची. लग्न नावाच्या इव्हेंटची. अलिकडे बहुतांशी लग्न सामाजिक परंपरेची बंधनं झुगारून स्वत:ला नव्या ढंगात बांधू पाहात आहेत. घरच्या लग्नाला मीडिया स्टाइल परिमाणं लाभली आहेत आणि घरचं लग्न म्हणजे जणू काही एखादा एपिसोडच वाटू लागलाय.
‘सलाम-ए-इश्क’ मधला सलमान खान आठवतोय?
घोडीवर बसून ‘तेनु लेकंे मैं जावांगा..’ असं गाणं म्हणत येणाऱ्या सलमानला पाहिल्यावर आपला नवराही असाच घोडीवर सजून-धजून यावा हे अनेकींना वाटू लागलं.
खरंतर हे तसं कठीणच काम, पण ते जमवून आणलं जाऊ लागलं. हॉलपासून काही अंतरावर का होईना मग अगदी रीतीरीवाजात नसलं तरी नवरदेवाला घोडीवर बसवलं जाऊ लागलं. त्याच्या आजूबाजूला भोवती नाचण्यासाठी बारातीही आले. आणि बारातींचं भव्यदिव्य स्वागत करण्यासाठी लग्नात सेलिब्रिटींची वर्णीही लागली. तिथूनच एका वेगळ्या लग्नाचा प्रवास सुरु झाला.
लग्न तशीही वाजतगाजत करण्याची गोष्ट. मधल्या काळात तरुणाईलाही रजिस्टर्ड पद्धतीने म्हणजे साधेपणाने लग्न करण्याच्या पुरोगामी विचाराने पछाडलं होतं. त्यामागे आई-वडिलांचे पैसे वाचवावेत असाच उदात्त विचार होता. मात्र आता तरुणाईकडेही पैसा खुळखुळतोय आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मनोरंजन विश्वाने वाजत्या-गाजत्या उधळखोर लग्नाचं जे काही मार्केटिंग केलंय त्यामुळे आपणही असं लक्षात राहीलसं लग्न करावं असं तरुणाईला वाटू लागलंय.
सेलिब्रिटींची लग्नं चॅनेल्सवर दाखवली जातायत. त्यातल्या भपकेबाज रिसेप्शनचा परिणाम उच्च मध्यमवर्गीय पिढीवरही होतोय. त्यातही मध्यमवयातला आधुनिक पालकही आपल्या एकुलत्या किंवा फार तर दोन मुलांच्या लग्नासाठी बऱ्यापैकी पैसा साठवून असतो.
टीव्ही आणि सिनेमातून गुजराती आणि पंजाबी लग्नांचे दिमाखदार सोहळे पाहून आपणही अशाच पद्धतीने लग्न लावून द्यावं असं वाटू लागलं नसतं तरच नवल.
‘हम आपके कौन’ या चित्रपटाने खऱ्या अर्थाने लग्न कसं असावं, हे आपल्याला दाखवून दिलं. तिथूनच ट्रेंड सुरू झाला ‘संगीत’ कार्यक्रमाचा. अगदी महाराष्ट्रीयन लग्नामध्येही मग ‘संगीत’चं आगमन झालं. खास एक दिवस नाचगाणं आणि जल्लोष होऊ लागला. या कार्यक्रमासाठी वेगळा ड्रेसकोड. मग त्यासाठी वेगळ्या पद्धतीने शेरवानी आणि चनिया चोली शिवून घेणे आले. नृत्य शिकण्याकरता कोरिओग्राफरची वर्णी लग्नात लागली. ज्यांनी कधी गणेशोत्सवातही नाच केला नाही त्या वधूच्या किंवा वराच्या आईवडिलांनीही ठुमका लावून नाचायला सुरुवात केली. हळदीच्या कार्यक्रमानेही दरम्यान कात टाकली. हळद अगदी दणक्यात होऊ लागला.


या सर्व निमित्ताने लग्न एका वेगळ्या उंचीवर जाऊन पोहोचलं. आहेर आणि रुखवताच्या चर्चा होऊ लागल्या. अमक्याच्या लग्नात साडेतीनशे रुपयांची पत्रिका होती, तर येणाऱ्या प्रत्येक पाहुण्याला राजस्थानी पद्धतीने बाटीकचा फेटा बांधला जात होता, हे दिमाखाने सांगितलं जाऊ लागलं. सेलिब्रिटींचं महत्त्व तर खूपच वाढलं. तमक्याच्या लग्नात चक्क शाहरुख खान हजर होता असे विषय आजूबाजूला रंगू लागले. त्यामुळे ओळखी काढून किंवा प्रसंगी पैसे देऊन मनोरंजन विश्वातली माणसं लग्नात आमंत्रित केली जाऊ लागली. राजकारणातली धेंडंही लग्नातल्या प्रतिष्ठेच्या कल्पनांपायी आवर्जून हजेरी लावू लागली. गेलाबाजार सरकारी अधिकारी किंवा नगरसेवकही बोलावले जाऊ लागले.
आपलं लग्न गाजवायचंय, आपणही काहीतरी वेगळं करायचं, हा विचार मनात डोकावायला लागला आणि लग्नाच्या मॅनेजमेंटने या विचारापासून लग्नविश्वात प्रवेश केला. लग्नाचा इव्हेंट म्हणून विचार सुरू झाला. आणि व्यवस्थापनासाठी हा इव्हेंट कुणाकडे सोपवायचा याचेही पर्याय शोधणं सुरू झालं.
लग्न म्हटलं म्हणजे सर्वात मोठा प्रश्न असतो तो बजेटचा. तुमचं बजेट उत्तम असेल तर तुम्ही रईसी थाटात अगदी छानशौकीत लग्न करू शकाल. एका दिवसात आटोपणारी लग्न ही किमान आता पाच दिवसांची होऊ लागलेली दिसत आहेत. यात संगीत, मेहंदी असे प्रत्येक दिवसांचे कार्यक्रम वेगळे, त्या दिवसांचे ड्रेस वेगळे, देवदर्शनाचा एक दिवस अशी विविध कारणं वाढली आणि लग्नांच्या दिवसातही आपसुकपणे वाढ झाली.
ही वाढ होण्यामागचं कारण एकच स्टेटस सिम्बॉल. याच गोष्टीला अनुसरून गेल्या काही

दिवसांमध्ये ‘थीम मॅरेज’ ही संकल्पना फार मोठय़ा प्रमाणावर दिसून येत आहे. लग्नाच्या कार्डपासून ते अगदी बिदाईपर्यंत एका थीममध्ये असलेल्या या लग्नाची बातच काही और असते. ठराविक ड्रेस कोड आणि एक थीम डोक्यात ठेवून लग्न करणं म्हणजे आपण काहीतरी युनिक करतोय हेच पाहुण्यांना दाखवण्याचा हेतू असते. म्हणूनच अलिकडे एकमेकांच्या गळ्यात हार घालण्याचा सोहळा चार भिंतींच्या हॉलमधून बाहेर पडलेला दिसत आहे. म्हणूनच फार्म हाऊस, बीचेस्, क्रूझ, फेअरीटेल, फॅण्टसी, रोमान्स, रॉयल पॅलेस अशा थीमवर आधारीत लग्न मोठय़ा प्रमाणावर होऊ लागली आहेत.


इतकंच नाही तर ‘व्हॅलेण्टाईन डे’ला लग्न करणाऱ्यांची संख्याही कमी नाही. तर काहीजण ज्या दिवशी एकमेकांना ‘हो’ म्हटलं त्या दिवशी लग्न करायचं ठरवतात. इतकंच नाही तर ज्या कॉलेजमध्ये शिकत होतो, ज्या हॉलमध्ये आपण एकमेकांना पाहिलं तोच लग्नाचा हॉल त्यांना हवा असतो.
रॉयल थीममध्ये आपले जुने राजवाडे आणि त्यातील एकूणच सर्व भव्य दिव्यपणा हे लग्न पाहताना जाणवत राहतो. तिथलं एकूणच वातावरण जुन्या काळातील असून तो थाटमाट आणि त्यालाच अनुसरून वधु-वरांचे कपडेही ठरवले जातात. एखादा जुना वाडा घेऊन त्याला रंगरंगोटी करूनही लग्न लावली जातात. पण समजा असा जुना वाडा मिळाला नाही तर मात्र इव्हेंट ऑर्गनायझर वाडय़ाचा भव्यदिव्य सेट उभारून समोरच्या क्लायंटला त्याला हवं ते सर्व आयोजित करून देतो.
यासंदर्भात ‘सिम्पली इव्हेंट’च्या नेहा एस. यांनी लोकप्रभाच्या वाचकांसाठी या लग्नाच्या व्यवस्थापनातलं आंतरविश्वच उलगडून दाखवलं.
‘‘आम्ही खासकरून बीच मॅरेजेस आयोजित करून देतो. आज मुंबईहून खास बीच मॅरेज करण्यासाठी गोव्याला जाणारे अनेक लोक आहेत. मग यात कुठला बीच हवा आहे इथपासून ते अगदी बिदाईपर्यंत सर्व गोष्टींची जबाबदारी आम्ही घेतो. अनेकदा लोकांना भरतीचा क्षण आणि लग्नाचा मुहूर्त याची सांगड घालायची असते. समुद्राच्या लाटांच्या साक्षीने त्यांना एकमेकांच्या गळ्यात माळ घालायची असते. अशा व नाना अपेक्षा घेऊन लोक येतात तेव्हा त्या कशा व अधिक चांगल्या पद्धतीने कसं पूर्ण करू शकू, हाच विचार आम्ही करतो.
बीच वेडिंग म्हटल्यावर वेडिंग कार्डपासून ते अगदी बिदाईपर्यंत थीम कुठेच ब्रेक होता कामा नये याची काळजी घेतली जाते. कार्ड छापताना त्याला बीचचा टच् कसा देता येईल याचा विचार केला जातो. याकरता आम्ही स्पेशल टीमही ठेवलेली आहे.
शिवाय क्लायंटची रिक्वायरमेंट काय आहे, त्याला अधिक प्राधान्य देतो. अनेकांना ओपन बीच लग्नासाठी हवा असतो. तर काहीजण क्रूझमध्ये लग्न करण्याची पसंती दर्शवितात आणि रिसेप्शन बीचवर या अशा सर्व गोष्टींची सांगड घालताना एकच लक्ष्य डोळ्यासमोर असतं ते म्हणजे क्लायंटला समाधान मिळणं आणि त्याच्या पैशाचं चीज होणं. यात सर्वात महत्त्वाचा भाग असतो तो क्लायंटच्या बजेटचा. बजेट जितकं जास्त तितका हा सोहळा अधिक रंगतदार होतो हे सांगायला नको. पण काहीजणांचं बजेट कमी आहे. पण त्यांना बीचवरच लग्न करायचं आहे, मग अशावेळी काही इतर गोष्टींवर अधिक लक्ष केंद्रीत न करता त्यांना हवं तसं देण्याचा प्रयत्नही केला जातो.’’
नेहा एस. सांगत होत्या आणि लोकांच्या लग्न कसं करावं या मानसिकतेचा नवा पैलूच दिसून आला.
अलिकडच्या लग्नांमध्ये टीव्ही आणि चित्रपटांचा वाढलेला प्रभाव याबद्दल मॅरेज मॅनेजमेंटच्या इंडस्ट्रीत काय प्रतिक्रिया आहे याचा शोध घेण्यासाठी मग ‘ए टू झेड इव्हेंट’ या कंपनीचे संचालक गिरीश थापर यांना बोलतं केलं.
ते म्हणाले, ‘‘लग्न केवळ क्लायंटची रिक्वायरमेंट आहे आहे म्हणून आम्ही करत नाही. तर तो सोहळा नीट डिझाइन करण्याकडे आमचा कल असतो. आमची कंपनी मुंबईतील सर्वात नामांकित कंपनी आहे. आज जवळपास १०० वर्षे आम्ही याच क्षेत्रात आहोत, त्यामुळे क्लायंटला काय हवंय, हे आम्हाला पाहिल्यावरच कळतं. अगदी शंभर टक्के योगदान देण्यावर आम्ही भर देतो.
हृतिक रोशन, अक्षय कुमार, अभिषेक बच्चन, राजकीय क्षेत्रातील महत्त्वाच्या व्यक्ती यांची लग्नही आम्हीच आयोजित केली आहेत. साधा आमचा बॅण्ड पथक जरी असला, तरी त्यातील सर्व वादक गुळगुळीत दाढी केलेले असतात. जे द्यायचं ते उत्तम द्यायचं हेच एकमेव उद्दीष्ट आमच्या डोळ्यासमोर आहे आणि तेच ठेवून आम्ही पुढे जातोय. म्हणूनच आम्ही गमतीनं म्हणतोही, की वधू-वर सोडून आम्ही सर्व काही मॅनेज करू शकतो.
ग्राहकांच्या गरजा आणि अपेक्षाही वाढू लागल्या आहेत.
बजेटप्रमाणे लोकांच्या आवश्यकता कशा पूर्ण करता येईल याचा आम्ही विचार करतो. कधी कधी ग्राहकाला त्याच्या बजेटमध्ये लग्न बसवून देताना दर्जाशी तडजोड केली जाते. पण आम्ही मात्र ती कधीच करत नाही.

आजचा एकूणच ट्रेंड पाहता ज्यांच्या लग्नात आजपर्यंत कधी ‘संगीत’ कार्यक्रम होत नव्हता त्यांनाही ‘संगीत’चे कार्यक्रम हवे आहेत. इतकंच काय तर अलिकडे लग्नात डीजेंचं प्रस्थ फार मोठय़ा प्रमाणावर वाढलं. मध्यंतरी एक काळ असा होता की, ऑर्केस्ट्रा लग्नांमध्ये असणं म्हणजे एक प्रतिष्ठेचं लक्षण मानलं जायचं. पण अलिकडे मात्र डीजे ठेवण्याकडे लोकांचा कल आहे. आजपर्यंत आम्ही अनेक उद्योगपती, सिनेस्टार यांची लग्न आयोजित केली आहेत. त्यामुळे अगदी बिग बजेट लग्नांना नेहमी काय वेगळं असावं आणि काय वेगळं द्यायचं याचा आमच्याकडून विचार केला जातो.
लग्न ही एक अशी गोष्ट आहे की हा प्रतिष्ठेचा विषय आहे. समोरची व्यक्ती कोण आहे त्याच्या आवडीनिवडी काय आहेत, त्यांची आवड आणि लग्नाची सांगड कशी घालावी याचा अभ्यास केला जातो. २२ नोव्हेंबरला शिल्पा शेट्टीच्या लग्नाचं आयोजनही आमच्याच कंपनीने केलं होतं. म्हणूनच आज शंभर वर्षांची परंपरा आमची कंपनी जपत आहे, आणि मुंबईत नंबर वन म्हणून ओळखली जाते’’ थापर सांगत होते.
लग्न आणि तिथे असणारं जेवण हाही एक प्रतिष्ठेचा महत्त्वाचा मुद्दा. याकडे दुर्लक्ष करून तर बिलकुल चालणार नाही. साधारण दहा वर्षांपूर्वी किमान तीन ते चार भाज्या आणि काही ठराविक गोड पदार्थ असलेलं लग्न म्हणजे ‘वाह क्या बात है,’ हे वाक्य तोंडी यायचं. अलिकडे पाणीपुरी पासून ते अगदी बटाटेवडेही लग्नात विराजमान झाले आहेत. भाज्यांचे इतके पदार्थ असतात की, अर्धी अधिक काऊंटर्स माहीतही नसतात. इतका मोठ्ठा जेवणाचा थाटमाट पाहता काय खायचं, हाच प्रश्न पडतो. सर्व प्रांतातील पदार्थ आणि विविध प्रकारची गोड पक्वान्न खाताना पोट तर भरूनच जातं. शिवाय घरी गेल्यावर काय खायचं राहिलं यावरही चर्चा होते.
लोकांच्या खाण्याची रुचीत या आधुनिकतेच्या वादळात काही बदल झालाय का हे जाणून घेण्यासाठी दादरच्या तृप्ती कॅटरिंगचे आनंद भालेकर यांना बोलतं केलं.
ते म्हणाले, ‘‘लव्ह मॅरेज असेल तर दोन्ही बाजूच्या लोकांच्या आवडीनिवडी लक्षात घेऊन पदार्थ ठरविले जातात. अलिकडे नॉनव्हेज पदार्थ जेवणात ठेवण्याकडे लोकांचा कल दिसून येत आहे. जेवण आणि लग्न यांची सांगड बांधताना लग्नात तुम्ही काय डेकोरेशन करता याला महत्त्व नाही तर, काय खायला देता याला महत्त्व आहे असं त्यांनी आवर्जून सांगितलं.
एकूणच या सर्व गोष्टींवर एक नजर टाकल्यास आपल्या हे लक्षात येईल की केवळ लग्न करण्याच्या पद्धतीच बदलल्या नाहीत. तर लोकांच्या मानसिकतेमध्येही आमूलाग्र बदल झाला. पूर्वी लग्न म्हटल्यावर हॉलवर जाण्याच्या आदल्या रात्री काय सामान न्यायंच आहे, याची यादी केली जायची. त्याप्रमाणे सामान नेण्याची व्यवस्था केली जात असे. पण तरीही कुठेतरी काहीतरी राहिलं म्हणून होणारी धावपळ चिडचिडही दिसत असे. म्हणून अलीकडे अगदी साधं हॉलमधलं लग्न असलं तरी हॉलवालेच तांब्याच्या भांडय़ापासून ते अगदी ओटी भरण्यापर्यंत सर्व काही उपलब्ध करून देतात.
लग्न ठरवण्याच्या पद्धती बदलल्या पूर्वीचा कांदेपोहेंचा कार्यक्रम केव्हाच मागे पडला आणि आता चक्क एकमेकांना भेटण्यासाठी हॉटेल्सची निवड होऊ लागली. घरातल्या चार भिंतीच्या आत तिच्या चेहऱ्याकडे नजरही टाकता येत नसे. मग पसंती काय दर्शवणार? उपस्थित असणाऱ्या काक्या-माम्यांच्या प्रश्नांच्या सरबत्तीत तिचं साधं रूपही खुलून कधी दिसत नसे.
काळ बदलला आणि एकूणच लग्नाचं रूपही पालटलं. साधा परंतु दिमाखदार अशा या सोहळ्याला वेगळ्या उंचीवर आज आपण पाहात आहोत. अगदी पूर्वीची लग्न दहा दिवस चालायची. पाहुण्यांची लगबग आणि दारातले केळीचे खांब दिसल्यावर आता अमक्याकडे लग्न आहे म्हणजे जेवणाचा प्रश्न सुटला, असं म्हणणारे महाभाग कमी नव्हते. मग आदल्या दिवशी हळद दळणं, दुसऱ्या दिवशी हळद उतरवणं, तिसऱ्या दिवशी पाचपरतावणं असे नानाविध सोहळे अगदी आनंदाने आणि उल्हासाने पार पडायचे. लग्नाच्या पद्धतीतही बदल झाला. किमान आधुनिक विचारसरणी लग्नाच्या बाजारात मोठय़ा प्रमाणावर आली. इतकंच काय तर अलिकडे लग्नाच्या मांडवात हनिमूनचा विषयही अगदी दिलखुलास चर्चिला जाऊ लागला. आधुनिकतेची कास धरणाऱ्यांनी तर हनिमून टीप्सही लग्नात द्यायला सुरुवात केली.
पण जुन्याची कास नाही म्हणत का होईना आपण पुन्हा पूर्वीसारखंच लग्नाचे दिवस वाढवून ठेवले यात शंका नाही. अर्थात त्यात बदल मात्र मोठय़ा प्रमाणावर झाले. पूर्वी जात्यावर दळली जाणारी हळद आता कुठे राहिलीच नाही जातंही मागे पडलं आणि ती दळताना गाणाऱ्या बायकाही मागे पडल्या. उष्टी हळद लावणं, न्हाऊ माखू घालणं, हा एक कार्यक्रम असे अनेक कार्यक्रम आज आपण नवीन ट्रेंड म्हणून पाहात आहोत, पण खरंतर हे जुनंच दळण नव्या पद्धतीने दळत आहोत. फक्त बदल झाला तो साजरा करण्याच्या पद्धतींमध्ये.

रिसेप्शनला जाताना लक्षात ठेवण्याच्या गोष्टी
समारंभाचा व्हेन्यू पत्रिकेवर काळजीपूर्वक वाचून नीट समजावून घ्यावा. सारख्याच नावाच्या वेगवेगळ्या दिशेच्या ठिकाणामुळे गोंधळ होऊ शकतो. समारंभाची वेळ आणि ट्रॅफिक किंवा सार्वजनिक वाहनांमधल्या गर्दीचा अंदाज घेऊन प्रवासाचं नियोजन करावं.
समारंभाला भेटवस्तू घेऊन जायच्या असल्यास त्याचं गिफ्ट रॅपिंग आधीच करून घ्यावं. आयत्यावेळी हॉलच्या आसपास त्यासाठी धावपळ करू नये. पैसे द्यायचं पाकिट नाव वगैरे लिहून आधीच तयार ठेवावं. फक्त शुभाशीर्वाद असं पत्रिकेत लिहिलं असल्यास फुलांचे गुच्छ घेऊन जावेत. मात्र भेटवस्तू वा फुलांचे गुच्छ आणू नये असं स्पष्ट लिहिलं असल्यास फुलांचे गुच्छ घेऊन जाऊ नये. कारण त्यामुळे ज्यांनी गुच्छ आणले नाहीत त्या पाहुण्यांना त्यामुळे अवघडल्यासारखं होतं.
काही धर्मियांच्या लग्नसमारंभात आमंत्रण पत्रिकेवर ठराविक ड्रेसकोड उद्धृत केलेला असतो. त्यानुसार कपडे परिधान करावेत.
तुम्ही कुणाच्या लग्नाला जात आहात यावरुन तुमचा ड्रेस ठरतो. तसेच लग्न कुणाचं आहे त्याप्रमाणे आपली वेशभूषा आणि केशभूषा बदलावी लागते.
जवळच्या नातेवाईकांच्या लग्नात जरीच्या किंवा काठपदराच्या साडय़ा शोभतात. अशावेळी साधारण पारंपरिक वेशभूषेवर भर द्यावा. मोकळे केस सोडण्यापेक्षा आटोपशीर केशभूषा ठेवावी. केसांत गजरा किंवा फुलं माळावीत. नात्यातल्या लग्नात भरपूर सोन्याचे दागिने मिरवता येतात.
नात्यातलं लग्न नसल्यास मात्र फार दागिने घालू नयेत. स्त्रियांनी कार्यक्रमाचं स्वरूप बघून साडी दागिने निवडावेत. ट्रेण्डी, मोजके अलंकार, सिल्कची साडी अशा समारंभासाठी उत्तम. मोकळे केसही चालतात.
रिसेप्शन हॉलमध्ये आहे का, बाहेर लॉनवर आहे यावरही कुठले कपडे घालावेत हे ठरवावं.
लग्नाला जाताना आपण कोणत्या पद्धतीने जाणार आहोत हेही लक्षात घ्यावं. स्वत:च्या वाहनाने जाणार असाल तर थोडी गॉडी वेशभूषा करता येते. परंतु सार्वजनिक वाहनाने प्रवास करून रिसेप्शनपर्यंत पोहचायचं झाल्यास काही भपकेबाज अलंकार टाळावेत किंवा हॉलवर जाऊन घालावेत. सुरक्षिततेच्या दृष्टीने ते चांगले.
सार्वजनिक वाहनाने जाणार असल्यास मेकअपचा छोटा किट सोबत ठेवावा आणि मौल्यवान अलंकार पर्समध्ये ठेवून द्यावेत.
समारंभातला परफ्यूम काळजीपूर्वक निवडावा लागतो. परफ्यूममध्येही वेगवेगळे प्रकार. ऑफिस किंवा पार्टीसाठी वेगळे परफ्यूम असतात. तर पारंपरिक समारंभासाठी वेगळे असतात. स्त्रियांचे आणि पुरुषांसाठीचे परफ्यूमही वेगळे असतात. सुवासिकता लक्षात घेऊन आणि कार्यक्रमाची नजाकत लक्षात घेऊन आपले परफ्यूम निवडावेत.
समारंभातली पादत्राणेही काळजीपूर्वक निवडावी लागतात. रिसेप्शनच्या वेळी हा बहुधा सर्वात दुर्लक्षित प्रकार असतो. लॉनवर लग्न असल्यास तसेच एसी हॉलमध्ये लग्न असल्यास चपलांचा प्रकार बदलावा लागतो. साडीवर, चनिया चोलीवर चपला चटकन दिसत नाहीत. पंजाबी ड्रेसवर किंवा सलवारवर चपला हा अ‍ॅक्सेसरीचा महत्त्वाचा भाग असतो.
आपल्या सोबत मुलं किंवा म्हातारी माणसं असतील तर त्याप्रमाणे आपली वेशभूषा आटोपशीर ठेवावी. आपल्या बरोबर असणारे ओळखीचे नातेवाईक किंवा पाहुणे काय घालणार आहेत हे जाणुन घ्यावेत. म्हणजे आपणही त्यांच्यातले एक वाटू.
रिसेप्शनला जाताना पर्स आणि मोबाइलची सुरक्षितता लक्षात घ्यावी.
हिवाळ्यात जात असल्यास पुरुषांसाठी ब्लेझर अधिक उत्तम. पुरुषांनी ट्रॅडिशनल किंवा आधुनिक समारंभाला अनुसरून पोशाख करावा. त्यावरून अ‍ॅक्सेसरीज निवडाव्यात. घडय़ाळ, चष्म्याची फ्रेम, शूज आणि परफ्यूमची निवड पोशाखाला अनुसरून करावी.
पुरुषांनी समारंभामध्ये बसून ऑफिसचे फोन किंवा ऑफिसबद्दलचे संभाषण या गोष्टी टाळाव्यात. फोनचा वापर वाजवी ठेवावा.

Share this:

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *