आपले केस सुंदर, दाट आणि चमकदार असावेत असं प्रत्येकालाच वाटतं. सुंदर केसांसाठी आहारविहाराची काही पथ्यं पाळायला हवीत. समतोल आणि पोषक आहार, नियमित व्यायाम, केसांच्या प्रकाराला अनुकुल अशी प्रसाधनं इत्यादी गोष्टी केसांचं आरोग्य चांगलं राखण्यास मदत करतात. केसांची योग्य खबरदारी न घेतल्यास केस रूक्ष होणं, टोकाशी दुभंगणं, निस्तेज दिसणं इत्यादी त्रास उद्भवतात. शरीरातलं रक्ताभिसरण योग्य पद्धतीने होण्यावरही केसांचे आरोग्य अवलंबून असतं. केसांचे आरोग्य निरोगी राहण्यासाठी उपयुक्त टिप्स: केस खराब होण्यामागे अनेक गोष्टी असतात. ऊन, वारा, उष्ण हवामान, प्रदूषण, केमिकलयुक्त प्रसाधनांचा वापर, पोषक आहाराचा अभाव आणि अनियमित व्यायामाची सवय इत्यादी सर्व घटक केसांच्या आरोग्याला धोका पोहोचवतात. ऊन, प्रदूषण, वारा, उष्ण हवामान इत्यादी काही गोष्टी टाळणं आपल्याला शक्य नाही. परंतु दैनंदिन व्यवहारात थोडी काळजी घेतली तर केसांचे आरोग्य चांगलं राखण्यास मदत होते.
योग्य प्रसाधनांचा वापर
उत्तम केस निरोगी शरीराची साक्ष देतात. म्हणून आपले आरोग्य निरोगी राखण्यासाठी सकस आणि चौरस आहार घेण्याची आणि नियमित व्यायाम करण्याची सवय करायला हवी. केसांबरोबर संपूर्ण आरोग्याच्या हितासाठी या दोन्ही गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत. तसंच केसांसाठी कुठली प्रसाधनं वापरता हेसुद्धा तितकंच महत्त्वाचं असतं. केमिकलयुक्त प्रसाधनं केसांना हानी पोहोचवतात. म्हणूनच नैसगिर्क घटक वापरून केलेला शाम्पू केसांसाठी वापरावा. हर्बल प्रसाधनं भारतासाठी नवीन नाहीत. परंतु आता भारताखेरीज अन्य देशांनाही त्याचं महत्त्व समजू लागलं आहे. केसांच्या आरोग्याला पोषक ठरणारे काही घटक:
काबुली चणे : यामध्ये नॅचरल प्रोटिन्स आहेत.
आवळा आणि हिरडा : यातल्या नैसगिर्क पोषकतत्त्वांमुळे केसांची मुळं मजबूत होतात.
ज्येष्ठमध : केसांची वाढ चांगली होण्यासाठी फायदेशीर.
दाक्षांच्या बिया: केसांमधील कोंडा आणि अॅण्टिमायक्रोबाइलवर अतिशय उपयुक्त.
पळसाची पानं : यामुळे केस दाट होतात.
टरबूज आणि कोरफड : केसांना आणि टाळूच्या त्वचेला मॉयइश्चर देतात.
सूर्यफुल, कमळ आणि सहस्त्रपणीर् : नैसगिर्क कण्डिशनरचं काम करतात.
तुमचे केस कुठल्याही प्रकारात मोडत असले तरी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा शाम्पू सौम्य असावा. तीव्र शाम्पू केसांना आणि टाळूच्या त्वचेला हानी पोहोचवतो.
समतोल आहार
समतोल आहाराच्या आपल्या सगळ्यांच्या संकल्पना अस्पष्ट आहेत. प्रदेश किंवा देशानुसार त्या बदलतात. म्हणूनच समतोल आहारापेक्षा केस चांगले होण्यासाठी आहार कसा असावा हे सांगणं सोपं आहे.
हिरव्या पालेभाज्या : पालक, दही, फळं (विशेषत: बेरी, मेलन), मोड आलेली कडधान्यं, ब्रोकोली, चिकन सॅण्डविच (गव्हाचा ब्रेड वापरावा) अंडी, दूध, बदाम, अक्रोड यांचा आहारात समावेश करावा. या पदार्थांमध्ये व्हिटॅमिन आणि प्रोटीन्स यांचं भरपूर प्रमाण असतं. डेअरी पदार्थ केसांच्या वाढीसाठी पोषक असतात.
रोज किमान आठ ते दहा ग्लास पाणी प्यायला हवं. पाण्याचं योग्य प्रमाणही केसांच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतं. तहान लागेपर्यंत पाणी पिण्यासाठी थांबू नका. तहान लागणं हे शरीरातील पाण्याचं प्रमाण अतिशय कमी झाल्याची सूचना असते. आहारात वरील सर्व गोष्टींचा सामावेश असावा म्हणून आग्रही राहू नका. परंतु तुमच्या आहारात लोह, प्रथिनं आणि जीवनसत्त्वं यांची योग्य प्रमाण असायला हवं याची खबरदारी घ्या.
निरोगी केसांसाठी:
नियमित व्यायाम, योगासनं आणि मेडिटेशन यामुळे केसांची वाढ चांगली होते. शरीर निरोगी असेल तर शरीराचे सर्व अवयव व्यवस्थित कार्य करतात. निरोगी शरीर नियमित व्यायामामुळेच मिळतं. म्हणून दिवसातून किमान वीस मिनिटं जॉगिंग करा किंवा शरीरातून भरपूर घाम निघेल इतकं जलद चाला. दिवसातून मोकळा वेळ मिळाल्यास दीर्घश्वसन करा. दीर्घ श्वसनामुळे रक्तामध्ये मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन मिसळतं. तसंच त्वचेलाही भरपूर ऑक्सिजन मिळतं. निरोगी मनासाठी मेडिटेशन गरजेचं आहे. मेडिटेशनमुळे शरीराची प्रतिकार क्षमता चांगली राहते. आत्मविश्वास आणि योग्य रक्ताभिसरण हे उत्तम मन:स्वास्थ्याचं लक्षण आहे. लक्षात ठेवा निरोगी राहणीमानामुळेच केसांचं आरोग्य उत्तम राहू शकतं.