महाराष्ट्रातील जंगलांची ठिकाणं

महाराष्ट्रातील जंगलांची ठिकाणं

महाराष्ट्रातील जंगलांची ठिकाणं

महाराष्ट्राला जसा छत्रपती शिवाजी महाराजांचा शूर आणि जाज्वल्य इतिहास लाभला आहे तसाच संपूर्ण परिसराला नितांत सुंदर असा भूगोल आणि वैविध्यपूर्ण जंगलांचादेखील वारसा लाभला आहे. आज आपण महाराष्ट्रातील जंगलांची ठिकाणं पाहू या.

जंगलातल्या स्वच्छ हवेत फिरणे आणि तेथील प्राणी-पक्ष्यांना मुक्तपणे त्यांच्याच साम्राज्यात वावरताना पाहणे हा एक सुंदर अनुभव आहे. जंगलाचे तिथे असणाऱया वनस्पतींच्या प्रकारानुसार वर्गीकरण केलेले असते. जसे- सदाहरित, पानगळीचे, शुष्क पानगळीचे, वर्षावन असे. त्याप्रमाणे तिथे पक्षी-प्राणी यांच्या अनेकविध जाती आढळतात. जंगल म्हटले तर उंचच उंच वेली आणि झाडांमुळे निर्माण झालेले निबीड अरण्य एवढंच नसतं, तर लांबच लांब पसरलेला गवताळ प्रदेशदेखील जंगलाचाच एक भाग आहे.

मुंबईजवळच असणारे बोरिवली नॅशनल पार्क सर्वांना माहीत आहे. तसंच पनवेलजवळील ‘कर्नाळा’ हे पक्षी अभयारण्य म्हणून आणि एक दिवसाचा पिकनिक स्पॉट म्हणून छान आहे. मात्र पुण्याजवळील भीमाशंकर आणि अलिबागजवळील फणसाड ही अभयारण्येही सुंदर आहेत. कोल्हापूर- सावंतवाडी मार्गावर असणारे सदाहरित आणि थोडेफार वर्षावनाकडे झुकणारे जंगल म्हणजे ‘आंबोली’. हे थंड हवेचे ठिकाण म्हणजे दुर्मिळ प्रजातींचे साप, बेडूक तसेच अनेक प्रकारच्या पाली आणि छोटे मोठे कीटक यांसाठी प्रसिद्ध आहे. पावसाळ्याची सुरुवात म्हणजे याचा अभ्यास करणाऱयांसाठी एक पर्वणीच असते. भुसावळजवळील पाल-यावल, नंदुरबारजवळील तोरणमाळ, धुळय़ाजवळील अणेर धरण आणि त्याजवळील परिसर, यवतमाळ जवळील टिपेश्वर, धाराशीवजवळील येडशी अशी छोटी जंगलेही आहेत,

दुर्मिळ पशुपक्षी

पुणे-सोलापूर मार्गावर चौफुलाजवळ असणारे ‘मयुरेश्वर सुपे’ या अभयारण्यात मोरांची संख्या जास्त आहे, तसंच इकडे ‘चिंकारा’ नावाचा दुर्मिळ असा प्राणी पाहावयास मिळतो. सोलापूरजवळील नान्नज आणि नगर जिह्यातील कर्जत तालुक्यात असणारे ‘रेहेकुरी’ ही जंगले काळवीटांसाठी प्रसिद्ध आहेत. नान्नज हे अतिशय दुर्मिळ अशा ‘माळढोक’ पक्ष्याचे महाराष्ट्रातील अखेरचे आशास्थान आहे. या दोन्ही ठिकाणी अजून एक दुर्मिळ प्राणी आढळतो आणि तो म्हणजे ‘लांडगा’.

ताडोबा के क्या कहने!

महाराष्ट्रातील चंद्रपूर आणि नागपूर या दोहोंच्या मधोमध असणाऱया ताडोबा जंगलात वाघांसोबतच बिबटय़ा, अस्वल, जंगली कुत्रे, साळिंदर, हनी बॅजर, रानगवा, चितळ, सांबर, नीलगाय, चौसिंगा अशा अनेक प्राण्यांचा वावर पाहायला मिळतो. शिवाय 350 हून जास्त प्रकारचे पक्षी आणि 250 हून जास्त प्रकारच्या फुलपाखरांचेही वास्तव्य आहे. नागपूरजवळील परिसरात पेंच, नागझिरा-नवेगाव, बोर, उमरेड कारहांडला अशी जंगलं आहेत या सर्व परिसरात राहण्यासाठी अनके हॉटेल्स आहेत.

पसरलेले ‘चांदोली’

पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, कोल्हापूर, सातारा आणि कोकणातील रत्नागिरी या सर्व जिह्यांच्या सीमेलगत ‘चांदोली’ अभयारण्य पसरलेले आहे. चांदोली हे कराडजवळील प्रसिद्ध अशा कोयना जलाशयाच्या मागे पसरलेल्या ‘कोयना’ अभयारण्याचाच भाग आहे. कोयनापासून सुरू झालेली जंगलरांग ही अणुस्कुरा ते गगनबावडा आणि कोल्हापूर ते कोकणातील फोंडा या मार्गावरील राधानगरी-दाजीपूर अभयारण्यापर्यंत पसरलेली आहे. या ठिकाणी अनेक वेळा बिबटय़ा, अस्वले, कोल्हे, रानगवे असे प्राणी दृष्टीस पडतात. अमरावतीजवळील ‘मेळघाट’देखील असाच एक नितांतसुंदर ‘व्याघ्र प्रकल्प’ आहे.

Leave a Reply