अमरावतीतील मेळघाटात वाघांची संख्या वाढलीय… प्राणीप्रेमींच्या दृष्टीने ही खरोखरच आनंदाची गोष्ट आहे… चला मग मेळघाटात भ्रमंतीला…
हिंदुस्थानात विविध राज्यांतील राखीव जंगलांमध्ये जरुरीपेक्षा जास्त प्रमाणात माणसांचा हस्तक्षेप दिसून येतो. दिवसेंदिवस जंगलामध्ये मनुष्याची घुसखोरी, अतिक्रमण मोठय़ा प्रमाणात आढळून येते. वन्य प्राण्यांचा अधिवास, त्यांना फिरण्यासाठी जी जागा जेवढी आवश्यक असते तेवढी मिळत नसल्यामुळे हे वन्य प्राणी मानवी वस्तीत प्रवेश करू लागतात.
आपण सर्व विविध दैनिक वृत्तपत्रांत वन्य प्राण्यांविषयीच्या बातम्या वाचतो. विविध चॅनेलद्वारे दृश्य पाहतो. जंगल क्षेत्रात एका आदिवासी महिलेवर वाघाचा हल्ला, लहान मुलाला वाघाने ठार मारले, बिबटय़ाने पाडय़ातील भरवस्तीत येऊन एक गाय मारली, अशा या घटनांमुळे जंगलात, पाडय़ापाडय़ात भीतीचे वातावरण निर्माण होते. मग त्यातून एखाद्या नरभक्षक वाघाची निर्मिती होते आणि वाघांनी माणसांवर केलेल्या हल्ल्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत जाते. अशा प्रकारच्या मनुष्य आणि वन्य प्राणी संघर्षाला सुरुवात होते. वन्य जीव अभ्यासकांनी या सर्वांचा सांगोपांग अभ्यास करून विचार केला तर त्यांना हे दिसून येते की, या संघर्षाला जबाबदार असतो तो माणूसच. मनुष्याच्या न संपणाऱया गरजा, हाव यामुळे आपण किती प्रमाणात वन प्रवेश करतो आहोत याचा जाणीवपूर्वक अभ्यास करणे जरुरीचे ठरते.
अमरावती जिह्यातील मेळघाट व्याघ्र प्रकल्प अपवाद
महाराष्ट्र राज्यातील अमरावतीमधील मेळघाट व्याघ्र प्रकल्प हा त्याला अपवाद आहे. या व्याघ्र प्रकल्पाचे वनक्षेत्र 767.36 चौरस किलोमीटर एवढे विस्तीर्ण असून एकाधिक वापर क्षेत्र ४६९.७५ चौरस किलोमीटर एवढे आहे. यात प्रामुख्याने सिपना, गुगामाळ, अकोट या तीन वन्य जीव विभागांत मोडतात.
व्याघ्र प्रकल्पाची सुरुवात २२ फेब्रुवारी १९७३ रोजी झाली असून या वर्षी हा प्रकल्प ४३ व्या वर्षात पदार्पण करीत आहे. सर्वात महत्त्वाची उल्लेखनीय बाब म्हणजे तिथे वृक्षतोड अजिबात होत नाही.
जंगलातील पडलेले वृक्ष, ओंडके ‘जैसे है वैसे’ स्थितीत पर्यटकांना जंगलभ्रमण करताना अनुभवायला मिळतात. वृक्षवेलींचे आयुष्य संपल्यावर किंवा वादळवारा, पावसामुळे जेव्हा उन्मळून पडतात ती मोठमोठी झाडे, ओंडके जसेच्या तसे त्याच नैसर्गिक स्थितीत स्थिरावलेले हजारो पर्यटकांना अनुभवायला मिळतात. त्या पडलेल्या ओंडक्याची कत्तल होत नाही हे अधिक महत्त्वाचे. त्याचे मुख्य कारण म्हणजे वन परिक्षेत्र अधिकारी, वनपाल यांची जागरुकतेने, सातत्याने होत असलेली गस्त.
जंगलात भ्रमंती करताना वनविभागातील कर्मचारी तसेच पर्यटक, प्राणिमित्र, निसर्गप्रेमी, हायकर्स, ट्रेकर्स, वन्य जीव अभ्यासकदेखील मेळघाटातील या व्याघ्र प्रकल्पाच्या अटी-नियमांचा सन्मान करतात. ते ओंडके, फांद्या बाजूला न करता सुरक्षिततेने ओलांडून जातात.
हे व्याघ्र प्रकल्प वनक्षेत्र वाघांच्या संवर्धनासाठी प्रसिद्ध असून वनविभागातर्फे शिकारविरोधी पथके येथे तैनात असतात. प्रौढ वाघांसाठी आणि बछडय़ांसाठी लागणारे भक्ष्य म्हणजे हरीण, सांबर, नीलगाय, गवे, ससे आणि इतर प्राण्यांची या वनक्षेत्रात विपुलता आहे. वाघांचे प्रजनन दोन वर्षांत ते तीन ते चार छावे जन्माला देतात. हे वन परिक्षेत्र वाघांना सर्वदृष्टय़ा पूरक असल्यामुळे वाघांसाठी तसेच वाघाच्या जतन, संवर्धन आणि संगोपनासाठी एक आदर्श व्याघ्र प्रकल्प म्हणून गणता येईल. जैवविविधतेने नटलेल्या या मेळघाटातील व्याघ्र प्रकल्पात जसे इतर वन्य जीव आहेत तसेच या जंगलात मोर, विविध प्रकारचे बहुरंगी, बहुढंगी पक्षी तसेच घार, गिधाड, सर्पगरुड (स्नेक ईगल), जंगली कुत्रे, लंगूर, वानर येथे आढळून येतात.
तर चला, तयारीला लागा. निसर्गमित्र, पर्यटक, पक्षीमित्र, प्राणिमित्र, वन्यजीव निरीक्षक, अमरावती येथील मेळघाट व्याघ्र प्रकल्पाला शैक्षणिक, साहसी भेट देण्यासाठी नियोजन करा. संकेतस्थळावर जाऊन त्याची सविस्तर माहिती घ्या व निवास आणि जंगल सफारी वाहनाचे आरक्षण करा. संकेतस्थळाला भेट द्या आणि आपला काही काळ आपल्या राष्ट्रीय संपत्तीचा आनंद लुटण्यासाठी वनराचन, जंगल निरीक्षण आणि वन्य जिवांचे निरीक्षण करा. हिंदुस्थानातील राष्ट्रीय संपत्तीचे जतन, संरक्षण आणि संवर्धन करण्यास महाराष्ट्र शासनाच्या वनविभागात सहाय्यभूत व्हा!
पर्यटकांसाठी व्यवस्था
मेळघाट व्याघ्र प्रकल्पात व्याघ्र दर्शनासाठी महाराष्ट्र शासनाच्या वनविभागातर्फे उत्तम निवास व्यवस्था केलेली आहे. यासाठी दोन व्यक्तींना ७०० रुपयात टू बेडच्या सोफाकंटेण्ट रूम्स उपलब्ध आहेत. पर्यटक जर ग्रुपने गेले तर डॉर्मेटरीसुद्धा उपलब्ध असून प्रति व्यक्ती फक्त २०० रुपयांत आपली निवास व्यवस्थेची चांगली सोय तिथे होऊ शकते. सर्व निवासस्थाने सीमाडोह आणि कोलकर येथील वनक्षेत्रात असून त्यांचे आरक्षण किंवा अधिक माहिती आपण melghatechotourisum.com या संकेतस्थळावरून घेऊ शकता. त्यावर लॉगीन करून आपल्याला जंगल सफारीसाठीच्या वाहनांचीसुद्धा माहिती व आरक्षण करता येते. सदर सफारी वाहनात सहा आसनांची व्यवस्था आहे. सफारी प्रति व्यक्ती २४४ रुपये असे शुल्क आकारले जाते. पर्यटकांसाठी सकाळी ६ ते ८ आणि दुपारी १ ते ५ या वेळेत आपण मेळघाटामधील व्याघ्र प्रकल्पाचा आनंद लुटू शकता.
वाघांच्या संख्येत वाढ
या व्याघ्र प्रकल्पात येत्या काही वर्षांत वाघांची मोठय़ा प्रमाणात वाढ होणार आहे. त्याच्या आकडेवारीचा अभ्यास करता असे आढळून येते की, २०१२ मध्ये वाघांची संख्या २० ते३० होती, तर २०१७ मध्ये आता ती ६०च्या वर गेलेली आहे. म्हणजेच याचा अर्थ असा की, भौगोलिकदृष्टय़ा या व्याघ्र प्रकल्पाचे वनक्षेत्र एक आदर्श वनक्षेत्र म्हणून म्हटले पाहिजे. या जंगलात ४३ प्रौढ वाघ आणि १७ छावे म्हणजेच वाघांची संख्या सुमारे ६० आहे. एवढय़ा प्रचंड प्रमाणात वाघांच्या संख्येत वाढ झालेली असली तरी त्यापासून मानवी वस्तीला काहीही धोका उद्भवणार नाही, याचे संशोधनात्मक कारण म्हणजे वाघांचे भ्रमण फक्त ५८ चौ. किलोमीटर क्षेत्रात होत असते आणि सुमारे २००० चौ. किलोमीटरचे परिक्षेत्र अजून शिल्लक आहेच.
अभयारण्यात प्रवेश करण्यापूर्वी योग्य अधिकाऱयाकडून आवश्यक ती अनुमती घ्या.
वन्य जीव जवळून न्याहाळण्यासाठी शांतता राखा.
डायरी आणि दुर्बीण जवळ बाळगा.
वन्य जीव पाहताना त्याच्या हालचाली, लकब याचे निरीक्षण करा.
पवित्र ठिकाणांचे पावित्र्य पाळा, स्थानिक चालीरीतींचा आदर करा.
आपल्याबरोबर भरपूर पाणी ठेवा. प्रथमोपचाराचे साहित्य जवळ ठेवा.
अभयारण्य परिसराशी जुळणारे साधे, सैलसर कपडे घाला.
अभयारण्य आणि तेथील मालमत्ता यांचा योग्य आदर करा.
अभयारण्य स्वच्छ ठेवा. प्लॅस्टिकचा वापर टाळा.
(वेळेनुसार) सूर्यास्ताआधी अभयारण्य सोडा.
या गोष्टी टाळा
ठरलेल्या वेळेपूर्वी अभयारण्यात प्रवेश करू नका.
निषिद्ध ठिकाणी प्रवेश करू नका.
सफारी गाडीतून हात किंवा अंग बाहेर काढू नका.
सफारी बसमधून सूचनेशिवाय उतरू नका.
मधाच्या पोळय़ांना धक्का लावू नका किंवा त्यावर काही फेकू नका. त्याने जिवाला धोका आहे.
सफारी वाहनाने जंगलात जाताना प्रथम प्राधान्य वन्य प्राण्यांना द्या.
जंगलात वन्य जीव हे मालक आणि आपण पर्यटक पाहुणे आहोत हे लक्षात घ्या.
निरुपयोगी वस्तू, खाद्यपदार्थ, कागद, कचरा इतस्ततः फेकू नका. आपल्याबरोबर एक कागदी पिशवी ठेवून त्यातच ते टाका.
तुमच्याबरोबर पाळीव प्राणी, ट्रान्झिस्टर, टेपरेकॉर्डर किंवा संगीत साधने अभयारण्यात नेऊ नका.
अभयारण्यातील प्राण्यांना, माकडांना चिडवणे इत्यादी करू नका.
वन्य प्राण्यांना त्याच्या हालचालींत व्यत्यय येईल असे करू नका.
प्रखर प्रकाशझोत वापरणे टाळा.
व्याघ्र प्रकल्पात वनपरिक्षेत्रात आणि अभयारण्यात असताना शेकोटी करू नका.