गॉन ‘केस’!

गॉन ‘केस’!

 

माणूस गोरा होणार की काळा, उंच होणार की बुटका, जाड की बारीक अशा असंख्य गोष्टी ठरवणारी कळ लपलेली असते ती त्याच्यातील डीएनएच्या रचनेत. माणसाच्या शरीराची तसेच मनाची ठेवण निश्चित करणारा डीएनए हा पायाच. या पायातील एक वीट असते ती माणसाच्या डोक्यावर किती केस उगवतील आणि ते किती काळ टिकतील, हे ठरवणारी. डोक्यावरचे केस मोठ्या रुबाबात मागे सारणे हे जणू तरुणाईचे स्टाइल स्टेटमेंटच. मात्र हे स्टेटमेंट किती काळ टिकेल, हे ठरवण्याचे सर्वाधिकार डीएनएकडेच. डीएनएमधील नेमका कोणता घटक त्यास कारणीभूत असतो, हे आतापर्यंत फारसे कळलेले नव्हते. मात्र लंडनच्या किंग्ज कॉलेजमधील प्राध्यापकांच्या नेतृत्वाखालील पथकाने केलेल्या संशोधनात या घटकांवर बऱ्यापैकी प्रकाश पडला आहे. डोईवरचे केस गळून चमचमते टक्कल मिरवण्याची वेळ काही पुरुष मंडळींवर अगदी तरुण वयातच येत असते. आपली मित्रमंडळी मोठ्या रुबाबात डोक्यावरचे केस मागे सारत असताना यांना मात्र टकलावरूनच हात फिरवण्यात समाधान मानावे लागते. या गॉन ‘केस’ला कारणीभूत असतात ते डीएनएमधील दोन विशिष्ट घटक. हे घटक आदल्या पिढीकडून यांच्यात वाहत आलेले असतात. ज्या लोकांच्या डीएनएमध्ये टकलास कारणीभूत दोन्ही घटक असतात, त्यांच्यापैकी जवळपास ७० टक्के लोकांमध्ये केस लवकर विरळ होण्याची, जाण्याची शक्यता असते. दर सात तरुणांमागे एका तरुणातील डीएनएमध्ये टकलास कारणीभूत घटक असतात. वयाच्या ४५व्या वर्षापर्यंत डोक्यावरील केसांना रामराम ठोकावा लागणाऱ्यांचे प्रमाण एक तृतीयांश इतके आहे, तर वयाच्या साठीपर्यंत ते प्रमाण दोन तृतीयांश इतके आहे. अशी सारी माहिती संशोधनातून हाती आल्याने टकलामागील कारणे शोधण्याच्या प्रयत्नांना नवे बळ मिळू शकेल. अर्थात, असा प्रकाश पडला म्हणजे तरुणाईत उद्भवणाऱ्या टकलावर तातडीने तोडगा निघेल, असे नव्हे. डीएनएमधील ज्या घटकांमुळे लोकांना ऐन तारुण्यातच केस गमवावे लागतात, त्यांचा परिणाम रोखण्यासाठी काय करावे लागेल, यावर संशोधन व्हावे लागेल. त्यातील निष्कर्षांना अनुसरून काही औषधांची निमिर्ती करता येईल. मुळात आपल्यातील डीएनएमध्ये असा काही घटक आहे का, हे पाहण्यासाठी लोकांना तशी चाचणी करून घ्यावी लागेल. हे सोपस्कार यशस्वी रीतीने पार पडले तर मात्र टकलावर हमखास उपाय मिळेल, हे नक्की.

Leave a Reply