तरुण प्रत्येक गोष्टीत स्टाइल शोधत असतात. अगदी नखांपासून केसांपर्यंत सबकुछ स्टाइल असा त्यांचा फंडा असतो. सध्या उन्हाळ्याच्या सिझनचा विचार करुन वेणी स्टाइल (पोनी) तरुणाइत लोकप्रिय झाली आहे. मिशीच्या आकारात दाढी कोरुन मिशांना टोकदार पीळ ठेवण्याची फॅशन तर कट्टा ग्रुपचा स्टेटस सिम्बल बनला आहे. एखादा ट्रेंड आला की तो वाऱ्यासारखा सगळ्या ग्रुपमध्ये पसरतो. केस आणि मिशांच्या स्टाइलबाबत तर हे सूत्र तंतोतंत लागू पडते. कारण सारखी रचना किंवा मिशा व दाढींचा ट्रेंड सगळीकडे आढळत असल्याचे दिसते. सध्या तरुणाइत क्रेझ असलेल्या काही स्टाइल.
स्पाइक
आमीर खानने ‘दिल चाहता है,’ या चित्रपटात बारीक केस ठेवले होते. ही स्पाइक स्टाइल तरुणाइच्या अजूनही डोक्यावर दिसते. याचबरोबर आमीर खानने हनुवटीवर केसांचा बारीक ठिपका याच चित्रपटात ठेवला होता. हा बारीक ठिपका तर तरुणाइ तिळासारखा वापरत असल्याने ही स्टाइल सर्वात जास्त लोकप्रिय आहे. आमीर खानच्या स्पाइकसारखीच ‘बर्फी’ चित्रपटातील रणवीर कपूरच्या बारीक केसांची स्टाइलही प्रत्येक ग्रुपमध्ये दिसून येते.
वेणी स्टाइल
संपूर्ण केस बारीक करुन महिलांच्या वेणीसारखे केस ठेवण्याची पोनी स्टाइल सध्या उन्हाळ्याच्या तडाख्यात पोरांना जाम आवडलेली दिसते. ही पोनी विविध रंगानी रंगवून तिला आकर्षक बनवण्याचेही दिसते. लुंगी स्टाइल डान्ससारखी ही पोनी स्टाइल क्रेझ खुमासदार चर्चेचा विषय ठरली आहे.
पमिंग स्टाइल
केस कुरळे करुन दोन शेडमध्ये रंगवलेले तरुण बाइकवरून सुसाट जाताना आपल्याला दिसतात. केसांचे पमिंग करणे किंवा कर्ली करणे असे या स्टाइलचे नाव आहे. केस वाढवून हे पमिंग केले जातात. ही स्टाइलही फेमस आहे.
योयो हनिसिंग स्टाइल
डोक्यावरील सर्व बाजूंचे केस बारीक ठेवून फक्त मधला पट्टा झुपकेदार पिसांसारखा ठेवणारी तरुण मुलं कॅम्पसमध्ये सहज दिसतात. गायक हनिसिंग याच्या नावाने ही स्टाइल फेमस आहे. योयो हनिसिंग असे या स्टाइलचे नाव आहे. वाऱ्याबरोबर केसांचे हे डोलदारे झुपके पाहणाऱ्यांनाही वेगळेपणाचा भास देतात.
चक्की स्टाइल
केसात घाम साचल्यामुळे केस मोठ्या प्रमाणात गळतात. केस गळणे थांबवण्यासाठी व केस मजबूत व्हावेत म्हणून उन्हाळ्यात डोक्यावरील संपूर्ण केस म्हणजेच चक्की करण्याचे सध्या फॅड दिसत आहे. ही स्टाईलही मोठ्या प्रमाणात तरुणाईमध्ये दिसून येते.
रामलीला मिशा स्टाइल
कॉलेजीयन तरुणाइ शाहरुख, सलमान खानसारखे संपूर्ण चेहरा चकोट करण्याला प्राधान्य देत असे. चेहरा गुळगुळीत ठेवण्याकडेच बराचसा कल असे. ‘रामलीला’ चित्रपटानंतर मात्र या चकोट राहण्याचा फंडा कमी होत गेला. रणवीरसिंहचा पीळदार मिशांचा लूक तरुणाइने आत्समात केला आहे. त्यामुळे तरुणाई मिशांना टोकदार पीळ देत नव्या रामलीला स्टाइलच्या प्रेमात पडलेली दिसून येते.
कोरीव दाढी
मिशांच्या टोकदार पीळ असताना दाढीही कोरीव ठेवण्याला सध्या तरुणाईकडून प्राधान्य दिले जात आहे. इतरांपेक्षा हटके दिसावे यासाठी असे सारे खटाटोप सुरु असल्याचे तरुणाइकडून सांगण्यात आले.
सध्या नुसते केस कापणे किंवा दाढी करण्यासाठी येणाऱ्यांचे प्रमाण खूप कमी आहे. नया क्या है? असं विचारतच तरुण ग्राहक येतात. जे नवीन आहे, तसे करा असे सांगितले जाते. त्यामुळेच मिशांना पीळ देऊन तो ब्राउन शेडमध्ये करण्याची मागणी वाढली आहे. पोनीलाही वेगळा कलर देण्याबाबतचा आग्रह असतो. मागणी तसा पुरवठा यानुसार आम्हाला काम करावे लागते. जमाना फॅशनचा आहे हे आम्हाला माहिती आहे. त्याच-त्याच फॅशन आलटून पालटून महिन्याला बदलताना दिसतात.
विकास गवळी
चालक, सिझर साउंड फॅमिली सलून
केस किंवा दाढी-मिशा वेगळ्या पध्दतीने ठेवल्या तर त्या लूकचे संपूर्ण कॉलेजमध्ये चर्चा होते. त्यामुळेच आम्ही सातत्याने नवे लूक ठेवतो. आमच्या ग्रुपमध्ये सातत्याने नव्या लुकचीच चर्चा होते. नव्या लूकमध्ये आम्ही कसे दिसतो यापेक्षा चर्चा होईल यासाठी हे नवे ट्रेंड आम्ही आत्मसात करतो.
विशाल ढेरे, बारावी, विवेकानंद कॉलेज